– दत्तात्रय गायकवाड
वाघोली -अनेक वर्षांनी होणाऱ्या सहकारातील प्रतिष्ठित असणारी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी तालुक्यातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, निवडणूक चुरशीची होणार आहे. या निवडणुकीची प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. यात 18 जागांसाठी 17 हजार 419 जण मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 1 मार्चपर्यंत या प्रारूप यादीवर हरकती नोंदविता येणार आहेत.
या आक्षेपांवर 1 ते 10 मार्च या कालावधीत निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर 15 मार्च रोजी अंतिम मतदार प्रसिद्ध होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने या निवडणुकीसाठी मोठी चढाओढ पहावयास मिळणार आहे. राजकीय प्राबल्य मिळवण्यासाठी विविध पक्षांच्या नेते मंडळींच्या बैठका मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या असून या बैठकांच्या माध्यमातून गट स्थापन करून किंवा पक्ष स्तरावर या निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात येणार आहेत.
आगामी विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावर या निवडणुकांवर प्रत्यक्ष प्रभाव निर्माण करणारी निवडणूक म्हणून ही निवडणूक ओळखली जाऊ लागली आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची प्रतिष्ठित लोकांनी बनवली आहे.
18 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी
निवडणुकीत 18 उमेदवार विजयी होणार आहेत. 18 पैकी 11 उमेदवार हवेली तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी सदस्यांच्या मतदानातून निवडले जाणार आहेत. यासाठी 134 सोसायटींचे 1 हजार 655 सदस्य मतदान करणार आहेत. चार उमेदवार ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडले जाणार आहेत. यासाठी हवेली तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींचे 713 सदस्य मतदान करणार आहेत. दोन व्यापार प्रतिनिधी निवडीसाठी सर्वाधिक मतदार मतदार आहेत. तब्बल 13 हजार 173 जण मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी अनेक दिग्गजांसाठी ही निवडणूक पूर्वतयारी ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. युवकांचा मतदान आणि उमेदवारीच्या रूपाने असणारा सहभाग लक्षवेधी ठरणार आहे.
-रमेश मदने, शेतकरी कोलवडी
कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे तालुका हवेली या निवडणुकीच्या माध्यमातून विविध कार्यकारी सोसायटी, ग्रामपंचायत व इतर यांच्यामधून प्रतिनिधी निवडले जाणार असल्याने शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था याचा सहकार क्षेत्राशी असणारा विश्वास पुन्हा एकदा दृढ होऊन नागरिकांना प्रतिनिधींच्या रूपाने तो अनुभवयास मिळणार आहे.
-संजय भोरडे पाटील, संचालक बोल्हाई वि. का. स. सोसायटी, वाडेबोल्हाई