यवत – पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गांवर भांडगाव ते चौफुला दरम्यान बऱ्याच ठिकाणी अनधिकृत रस्ता दुभाजाक बनवले गेले आहेत. याकडे सोयीस्करपणे महामार्ग आणि टोल प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे.
भांडगाव – चौफुला या महामार्गावर दोन – तीन ठिकाणी दुभाजक तोडून अनधिकृत कट मारून (दोन्ही बाजूंना जोडणारे मार्ग) तयार केले आहेत. या गलथान कारभारामुळे रस्ता ओलांडता येतो खरा, पण यामुळे अपघात देखील होऊन बळी जाण्याची चर्चा सध्या परिसरात आहे. गेल्या आठवड्यात देखील एक गृहिणी मनीषा संतोष सूर्यवंशी (रा. भांडगाव, ता. दौंड) यांचा रस्ता दुभाजक ओलांडताना मृत्यू झाला असल्याची घटना घडली.
महामार्गावर अशाच दुभाजक तोडलेल्या परिसरातच दुचाकी अपघात होऊन बळी गेल्याची घटना देखील घडल्या आहेत. तरीही महामार्ग प्रशासनाचे याकडे कायम दुर्लक्ष करत आहे. महामार्गवरील टोल प्रशासनाच्या पथकाकडून रात्रंदिवस या मार्गाने पेट्रोलिंग केले जाते;
परंतु या पथकाला हे अनधिकृत रस्ता दुभाजक दिसत नाहीत का? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. या ठिकाणी अनधिकृत कट मारून महामार्गांवरील रस्त्यावर भांडगाव फाटा ते एच. पी पेट्रोल पंप परिसरात दोन ते तीन ठिकाणी दुभाजक तोडले आहेत.
काय कारवाई करणार?
महामार्गावरील दुभाजक तोडून अनधिकृत कट तयार करणे दंडनीय अपराध आहे. याबाबत महामार्ग प्रशासन आणि टोल प्रशासन काय कारवाई करणार? अनधिकृत तयार केलेले रस्ता दुभाजक बंद होणार का? असे सवाल देखील उपस्थित केले जात आहे.
अनधिकृत पार्किंग डोकेदुखी
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कासुर्डी टोल नाका, यवत, भांडगाव चौक, चौफुला भागातील हॉटेल्स, ढाबे, चहा विक्रेते या भागात थेट महामार्गावर ट्रक पार्किंग केल्या जातात. अशाच उभ्या असणाऱ्या पार्किंग केलेल्या ट्रकवर कार आदळून देखील बळी गेल्याचे प्रकार घडले होते. तरीदेखील हे प्रकार थांबले नसल्याचे बोलेले जात आहे.