पुणे – यावर्षी जमीन, सदनिका यांच्या खरेदी-विक्री व्यवहारांच्या किंमतीचा अभ्यास केला असता पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात रेडीरेकनरच्या दरापेक्षा जादा दराने व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. पुणे शहरात सरासरी 6.49 टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये 12.34 टक्के, ग्रामीण भागात 9.2 टक्के आणि नगरपालिका हद्दीत 14 टक्के इतक्या जादा दराने खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्याचे समोर आले.
पुणे जिल्ह्यासाठी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनर दर निश्चित करण्याचे काम नोंदणी विभागाने हाती घेतले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2022 या 11 महिन्यांतील खरेदी-विक्री व्यवहारांच्या अभ्यास नोंदणी विभागाने केला. “एनआयसी’कडून या 11 महिन्यातील व्यवहारांची माहिती जमा करून त्याआधारे केलेल्या तपासणीमध्ये शहरासह ग्रामीण भागातील काही परिसरांमध्ये रेडी रेकनरच्या दरापेक्षा अधिक दराने व्यवहारांची नोंदणी झाल्याचे नोंदणी विभागास आढळून आले आहे.
या अभ्यासाअंती रेडी रेकनरच्या दरामध्ये पुढील आर्थिक वर्षात वाढ करण्याचा प्रस्ताव नोंदणी विभागाने तयार केला आहे.
ग्रामीण भागात वर्षभरात रेडी रेकनरच्या दरापेक्षा सरासरी 9.2 टक्के इतक्या जादा दराने व्यवहार होत असल्याचे
दिसून आले आहे. त्यामुळे आगामी वर्षांत हे दर वाढल्यास जमीन, सदनिकांचे भाव वाढणार आहेत, हे निश्चित आहे.
पुण्यातील पेठांमधील व्यवहार कमी दराने
पुणे शहरातील खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची अभ्यास केला असता यामध्ये शहरातील काही पेठांच्या परिसरात रेडी रेकनरच्या दरापेक्षा कमी दराने व्यवहार झाल्याने दिसून आले आहे. शहरातील काही पेठांमध्ये रेडी रेकनरच्या तब्बल 10 ते 16 टक्के इतक्या कमी दराने खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत. मात्र उपनगर परिसरात रेडी रेकनरच्या दरापेक्षा 10 ते 15 टक्के इतक्या जादा दराने व्यवहार झाल्याचे नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.