बेल्हे -सुरीचा धाक दाखवून बेल्हा परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी 10 ते 12 दरोडेखोरांनी अंदाजे 90 ते 95 हजार रुपयांची रोकड, 13 तोळे दागिने लुटुन दरोडा टाकल्याची घटना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.दरम्यान, दोन दिवसांत तीन दरोडे पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बेल्हे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामभाऊ बोरचटे यांच्या बंगल्यावर दोन दिवसांपूर्वी पिस्तुलाचा धाक दाखवून 49 तोळे सोन्याचे दागिने तसेच 4 लाख रुपये रोख रक्कम चोरट्यांनी दरोडा टाकुन चोरुन नेल्याची घटना ताजी असतानाच बेल्हे (ता.जुन्नर) येथील गुंजाळ मळ्यात रहात असलेले भाऊसाहेब बबन गुंजाळ यांना रात्री एक वाजण्याच्या सुमारास घराबाहेर कुत्री भुंकण्याचा आवाज आला.
दरवाजा कोणीतरी वाजवत आहे. असा आवाज झाल्याने ते जागे झाल्यानंतर त्यांनी आपल्या मित्रांना फोन लावत असतानाच घराचा दरवाजा तोडुन दहा ते बारा जणांनी घरात प्रवेश करत घरातील सर्वांना सुऱ्याचा धाक दाखवत दागिने व पैसे द्या असे म्हणत कपाटात असलेले अंदाजे 7 तोळ्यांचे दागिने व 90 हजार रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली.
तसेच याच रात्री दोन वाजण्याच्या याच मळ्यात रहात असलेले दिनेश पिंगट यांच्या घराचा दरवाजा वाजवत दार उघड असे म्हणत होते. पिंगट यांनी विचारले कोण आहे तर बाहेर असलेल्या सहा ते सात जणांनी जोरात दरवाजाला दणका देत घरात प्रवेश केला व घरातील सर्वांना एकत्र बोलुन चाकुचा दाख दाखवत कपाटात असलेले अंदाजे 6 तोळे सोन्याचे दागिने व 5 हजार रोख रक्कम चोरून नेली. जाताना घराला बाहेरून कडी लावुन चोरटे पसार झाले.