इंदापूर – भाजपमध्ये कार्यकर्त्याचा सन्मान केला जातो, सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन भाजप हा जगातील हा सर्वात मोठा पक्ष आहे. केंद्र व राज्याच्या विविध योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रचार व प्रसाराचे काम प्रभाविपणे भाजप कार्यकर्ता करीत आहे, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
इंदापूर येथे भाजपाच्या वतीने एकदिवशीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर उत्साहात झाले. आगामी लोकसभा, विधानसभेसह सर्व निवडणुका ताकदीने जिंकण्याचा संकल्प भाजप कार्यकर्त्यांनी या शिबिरात व्यक्त केला. यांनतर झालेल्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील बोलत होते. या शिबिरामध्ये कार्यकर्त्यांना भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी व केशव उपाध्ये, माजी आमदार मेधा कुलकर्णी, पुणे शहर भाजपचे माजी योगेश गोगावले व भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विविध विषयांवर कार्यकर्त्यांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले.
इंदापूर तालुक्यातील भाजपचे बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, पक्षाचे व मोर्च्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष डॉ. जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखाली भाजप राज्यात व देशात मजबूत झाला आहे. इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्यात अपयशी ठरल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.