शिक्रापूर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकार सेनेचे उपाध्यक्ष तसेच शिरूर-हवेलीचे माजी तालुकाध्यक्ष कैलास नरके यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशाने शिरूर तालुक्यात मनसेला मोठे धक्का बसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शिरूर तालुक्यात मनसेची ताकद वाढत असताना यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरूर शहराध्यक्ष अविनाश घोगरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केल्याने तर सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकार सेनेचे उपाध्यक्ष तसेच
शिरुर हवेलीचे माजी तालुकाध्यक्ष कैलास नरके यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काही पदाधिकाऱ्यांच्या समवेत शिवसेनेत प्रवेश केला आहे, एकीकडे पक्षात दुफळी निर्माण झालेली असताना गट निर्माण झालेले आहेत, प्रत्येक गट आपली ताकद दाखवण्यात व्यस्त झालेला आहे.
यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधान सभेची निवडणूक लढवलेले कैलास नरके यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, या प्रवेशाने शिरूर तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पडले असून वेगवेगळ्या चर्चेंना उधाण आले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून सर्वसामान्यांना ताकद
कैलास नरके म्हणाले की, यापूर्वी मी विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणारे नेते असल्याने आपण शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.