मंचर – जवळे (ता. आंबेगाव) येथील गायकवाड मळा येथे गोठ्यातील मेंढीवर बिबट्याने हल्ला करत तिला ठार केल्याची घटना घडली आहे. राहुल तुकाराम गावडे यांचा घराशेजारी गायींचा मुक्त गोठा असून या गोठ्यात चार, पाच मेंढ्या आहेत. त्यातीलच एका मेंढीवर बिबट्याने हल्ला करत तिला ठार करून बाजूच्या उसाच्या शेतात नेत तिचा फडशा पाडला.
याबाबत गावडे यांनी वनविभागाला कळवले असता वनरक्षक कदम, महेश टेमगिरे यांनी पंचनामा केला आहे. या आधीही गावडे यांच्या कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या आहेत. वन विभागाने येथे त्वरीत पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी दिनकर शिंदे, प्रकाश खिलारी, दत्ता गायकवाड, तुकाराम गावडे यांसह ग्रामस्थांनी केली आहे.
याबरोबरच एकलहरे (ता. आंबेगाव) येथील बागवस्तीवरील शेतकरी विवेकानंद चंद्रकांत रोकडे यांच्या घरासमोर बांधलेल्या दोन बकऱ्या बिबट्याने झडप मारून ठार केल्याची घटना आहे गुरुवारी (दि. 16) दिवसाढवळ्या सकाळी 11 च्या दरम्यान घडल्याने शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेमध्ये शेतकरी विवेकानंद यांचे अंदाजे 15 ते 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वन विभागाने जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी, अशी मागणी सरपंच राणी खैरे, उपसरपंच प्रीती डोके आणि ग्रामपंचायत सदस्य सुशील देठे यांनी केली आहे. वनविभाग कर्मचारी यांना या घटनेबाबत प्रशांत रोकडे यांनी दूरध्वनीद्वारे कळवले आहे.