शिक्रापूर – करंदी (ता. शिरूर) येथे रात्री दीड वाजता दिसलेल्या संशयित युवकांचा पाठलाग करत असताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. राजपाल कांतीलाल शेरावत (रा. शेरेवस्ती, धानोरे, ता. शिरुर) असे मृत्यू झालेल्या नाव आसून, सोनू फिरोज गुडदावत (रा. भुजबळवस्ती, सणसवाडी) व मंगल बजरंग नानावत (रा. वढू बुद्रुक) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत करंदीच्या पोलीस पाटील वंदना महेश साबळे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात खबर दिली.
करंदी येथे शनिवारी (दि. 17) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तीन युवक एका दुचाकीवरून जातान दिसले. यावेळी गावातील काही युवकांनी त्यांचा कारमधून (एमएच 12 यूसी 4358) पाठलाग सुरू केला. काही अंतर गेल्यानंतर युवकांचा अपघात होऊन तिघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक माधुरी झेंडगे, हवालदार शंकर साळुंके, श्रीमंत होनमाने, पोलीस नाईक रोहिदास पारखे, पोलीस पाटील वंदना साबळे, सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
तेथे जखमी झालेल्या तिघा संशयितांना मिलिंद ढोकले, वैभव ढोकले, गौरव ढोकले, किरण ढोकले, आकाश ढोकले, गोरक्ष ढोकले, शंकर जांभळकर यांच्या मदतीने शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले; मात्र यापैकी राजपाल शेरावत याचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक वैभव पवार व पोलीस शिपाई नीरज पिसाळ हे करीत आहेत.
मृत युवकासह एक सराईत गुन्हेगार
करंदी येथील घडलेल्या घटनेतील राजपाल शेरावत हा एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून तो फरार होता. तसेच मंगल नानावत हा देखील काही गुन्ह्यातील आरोपी असल्याने या प्रकारातील दोघे सराईत गुन्हेगार असल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले.