सध्याचे सर्व स्टॉल सणस मैदानाच्या भिंतीच्या बाजूला हलविण्याचा निर्णय
पुणे – सारसबागेच्या खाऊ गल्लीचे महापालिकेकडून पूर्णत: स्थलांतर करण्यात येणार असून येथील खाद्यपदार्थांचे 56 स्टॉल आता समोरील बाजूस सणस मैदानाच्या भिंतींलगत उभारले जाणार आहे. महापालिकेने त्यासाठीचा सुधारित आराखडा तयार केला आहे. त्यामुळे आता खाऊगल्लीच्या रस्त्यावरूनही पर्यटक तसेच पुणेकरांना सारसबागेचे दर्शन होणार आहे.
सध्या खाऊ गल्ली जवळील बागेच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूना स्टॉल असल्याने नागरिकांना त्या बाजूने सारसबाग दिसत नाही. त्यामुळे सारसबागेची खाऊगल्ली वॉकिंग प्लाझा करताना हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या बदलाचा आराखडा सोमवारी होणाऱ्या प्रशासनाच्या बैठकीत अंतिम केला जाण्याची शक्यता आहे.
सारसबागेच्या उत्तरेकडील प्रवेशद्व्राराबाहेर महापालिकेने खाद्य पदार्थांच्या स्टॉलला परवानगी दिलेली आहे. या ठिकाणी 56 स्टॉलला मान्यता देण्यात आली असून, त्यांना महापालिकेने व्यावसायासाठी जागा निश्चित करून दिली आहे. मात्र, या व्यावसायिकांकडून स्टॉलचे वाढीव बांधकाम करण्यासह रस्त्यावरच ग्राहकांना बसण्यासाठी टेबल खुर्च्या लावल्या जातात. त्यातच अनेक जण बेकायदेशीर रस्त्यावर साहित्य विक्रीसाठी बसतात त्यामुळे सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी आलेल्या नागरिकांना चालणेही शक्य होत नाही.
त्यामुळे वारंवार या अतिक्रमाणांवर कारवाई केली जाते. तर काही महिन्यांपूर्वी महापालिकेने ही खाऊ गल्लीच सील केली होती. त्यावरून निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी या खाऊ गल्लीच्या ठिकाणी वॉकिंग प्लाझा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार व्यावसायिकांशी चर्चा करून या ठिकाणचा आराखडा महापालिकेने तयार केला आहे. त्यात आता सर्व स्टॉल सणस मैदानाच्या सीमाभिंतीच्या बाजूला असणार आहेत.
वाहनतळ विकसित करणार
महापालिकेकडून या ठिकाणी वॉकिंग प्लाझा केल्यानंतर सारसबागेच्या परिसरात येणाऱ्या वाहनांसाठी पेशवे उर्जा उद्यानाच्या शेजारी असलेल्या पार्किंगच्या जागेत वाहनतळ विकसित केले जाणार असून त्या ठिकाणी किमान 500 वाहने थांबतील एवढी सुविधा विकसित केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांचीही गैरसोय होणार नाही. तसेच उत्तर बाजूचे प्रवेशद्वारही गरवारे बालभवनासमोरील बाजूला नेण्याबाबत विचार सुरू आहे. त्या बाजूने वाहनांसाठी रॅम्प असेल तर दक्षिण बाजूने केवळ चालत जाणाऱ्या नागरिकांसाठी प्रवेशद्वार ठेवण्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरू आहे.