आळंदी – इलेक्ट्रिक डीपीतील तांब्याच्या तारा आणि ऑइलची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गजाआड करून आठ गुन्हे उघडकीस आणण्यात आळंदी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरी केलेल्या तांब्याच्या तारा आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी असा एकूण 2 लाख 38 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संगम मोलई राजभर (वय 19), मोहित तेजबहादुर सिंह (वय 29), आकाश अखिलेश चौबे (वय 19), ईबादततुल्ला शेख (वय 19, सर्व रा.उत्तरप्रदेश, सध्या रा. धावडे वस्ती, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचे इतर दोन साथीदार रिहमततुल्ला शेख, संभाजी गौतम फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, पकडलेल्या आरोपींना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून डीपीतील तारा आणि ऑईल चोरीचे एकूण आठ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे.