मंचर -आंबेगाव तालुक्यातील विद्यार्थी घोडेगाव- गोनवडी येथील शासकीय आयटीआय येथे शिक्षण घेण्यासाठी दररोज ये-जा करतात; परंतु मंचर आणि घोडेगाव येथून एसटी बसच्या अपुऱ्या फेऱ्या आणि वेळेत नसल्याने विद्यार्थी मोटरसायकलवरून डबल किवा ट्रिपल सीट ये-जा करीत आहेत; परंतु पोलींस कारवाईच्या नावाखाली ऑनलाइन दंड करत असल्याने विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले आहे.
आंबेगाव तालुक्यात घोडेगाव (गोणवडी) येथे शासकीय आयटीआय आहे. येथे शिक्षण घेण्यासाठी 25 ते 30 किलोमीटर अंतरावरून एसटीने ये-जा करावी लागते.
राजगुरुनगर, नारायणगाव एसटी आगाराने आंबेगाव तालुक्यात एसटीच्या अपुऱ्या फेऱ्या असल्याने तालुक्यातील एसटी फेऱ्यांचे वेळापत्रक बिघडले आहे. अपुऱ्या एसटीमुळे मंचर येथून सुटणाऱ्या एसटीच्या फेऱ्या रद्द केल्या जात असल्याने बहुतांशी विद्यार्थी 25 ते 30 किलोमीटर अंतरावरून मोटरसायकलवर रोज ये-जा करतात. मंचरवरून घोडेगाव आयटीआयला जात असताना वाहतूक पोलीस विद्यार्थ्यांना आडवून कागदपत्र, लायसन्स तपासणी करण्याच्या नावाखाली त्रास देत असतात.
त्याचप्रमाणे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी मोटरसायकलवर तरकारी माल घेऊन जात असताना पोलीस शेतकऱ्यांना अडवून एक ते पाच हजार रुपये दंड करत असतात. एकीकडे दंडाची रक्कम भरताना पालकांच्या नाकीनऊ येत आहेत, तर दुसरीकडे एसटी प्रशासनातर्फे बसच्या फेऱ्या नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ते चुकवण्यासाठी विद्यार्थी दुचाकीचा वापर करीत आहेत; पण दंड भरावे लागत असल्याने पालकांनीही संताप व्यक्त केला आहे.