सिंहगडरस्ता -वडगाव खुर्द येथील लायगुडे रुग्णालयासमोर ड्रेनेज लाइन फुटून सांडपाणी रस्त्यावर येवून परिसरात दुर्गंधी सुटत आहे. महापालिकेच्या लायगुडे रुग्णालयासमोरच हा प्रकार वारंवार होत आहे. यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे तसेच परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या भागामध्ये अनेक रहिवासी सोसायटी आहेत, राजयोग ही सर्वात मोठी सोसायटी आहे, यातील रहिवाशांनीही याबाबत तक्रार केली आहे. महापालिकेच्या रुग्णालयासमोरच सांडपाणी वाहत असल्याने या परिसरात चालणेही अवघड झाले आहे. सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाने ड्रेनेज लाइनची दुरूस्ती करावी तसेच नवी योजना करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
याबाबत भा.ज.यू.मो.चे चिटणीस सारंग नवले यांनी सांगितले की, या परिसरात हा प्रश्न नेहमीच निर्माण होतो. प्रशासनाकडून तात्पुरती डागडुजी केली जाते. प्रशासकीय राजवट असल्याने सध्या याकडेही दुर्लक्ष होत आहे.
लायगुडे रुग्णालयासमोरील परिसरात ड्रेनेजचे चेंबर वारंवार तुंबते आहे. संबंधित विभागाला सांगून त्यावर कायमची उपायोजना करण्याचे नियोजन क्षेत्रीय कार्यालयाकडून केले जाईल.
– प्रदीप आव्हाड, सहआयुक्त, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय