पिरंगुट – सध्या जगभरात क्रिकेटचे पडघम वाजत आहे. मुळशी तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर फुलपीच टेनिस क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. यामुळे टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना सुगीचे दिवस आले आहेत. त्याचबरोबर स्पर्धेच्या ठिकाणी हंगामी स्वरूपात छोटे व्यवसाय करणाऱ्यांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.
सध्या देशभरात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर टेनिस क्रिकेट स्पर्धा होत आहेत. मुळशी तालुक्यातही सध्या मोठ्या प्रमाणावर क्रिकेट स्पर्धा होत आहेत. हाफ पीच क्रिकेटची जागा सध्या फुल पीच क्रिकेटने घेतली आहे.
लाखोंच्या घरात बक्षिसांची रक्कम या स्पर्धेला आयोजकांकडून ठेवली जात आहे. त्याचबरोबर अनेक वैयक्तिक बक्षिसे खेळाडूंना मिळत आहे. मुळशी तालुक्यात गेल्या वर्षी आयटीनगरी माण येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेने टेनिस क्रिकेट स्पर्धेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
दीड लाख रुपयांच्या पहिल्या बक्षिसाबरोबर स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज यांना दुचाकी गाडी भेट देण्यात आली होती. त्यामुळे खऱ्या अर्थाने खेळाडूंना एक प्रकारे खेळण्यासाठी नवीन ऊर्जा मिळाली. याच धर्तीवर अनेक ठिकाणी अशा खेळाडूंना स्पोर्ट सायकल, दूरचित्रवाणी संच व चषक देऊन गौरविण्यात येते.
टेनिस क्रिकेट असोसिएशनची स्थापना
मुळशीतील क्रिकेट स्पर्धेला अधिक वाव मिळावा व स्पर्धा नीटनेटकेपणाने पार पडावी यासाठी मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनची स्थापना करण्यात आली. असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धाचे आयोजन केले जात आहे. सर्व संघांची व संघातील खेळाडूंची असोसिएशनकडे नोंदणी केलेली आहे. एका स्पर्धेत पहिल्या येणा-या 25 किंवा 30 संघाना प्रवेश दिला जातो. नोंदणी असलेले खेळाडूच स्पर्धेत सहभागी होत आहे. या स्पर्धांचे यू ट्यूबवर थेट प्रेक्षपण केले जात आहे.
नामांकित स्पर्धांचे आयोजन
मुळशीत सभापती करंडक, पिरंगुट करंडक, रामेश्वर करंडक, भुगाव करंडक, राष्ट्रवादी करंडक, लवळे करंडक, राष्ट्रवादी चषक अशा अनेक नामांकित स्पर्धा होत आहे. प्रीमिअर लीगच्या धर्तीवर मुळशी प्रीमिअर लिग ही स्पर्धाही गतवर्षी संपन्न झाली. एखादा खेळाडू सामन्यादरम्यान मैदानावर चांगली कामगिरी करत असेल तर अशा खेळाडूंना आयोजकांबरोबर प्रेक्षकांमधून मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक पारितोषिक रोख स्वरूपात मिळत आहे.
टेनिस क्रिकेट ही एक इंडस्ट्री आहे. मुळशी तालुक्यात सर्वाधिक टेनिस क्रिकेट स्पर्धा होत आहे. खेळाडूंसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. मुळशी तालुक्यात जणू काही क्रिकेट स्पर्धा घेण्याची स्पर्धा सुरू आहे. इतर ठिकाणापेक्षा मुळशीत क्रिकेटला राजाश्रय मिळत आहे. अशा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना अनेक सुवर्णसंधी असून भविष्यात याचा फायदा होणार आहे.
– दीपक मंडले, क्रिकेट समालोचक
मुळशी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तीन वर्षापासून फुलपीच क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. यामाध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावतील तरुण युवकांना क्रिकेटमध्ये आपले प्राविण्य दाखवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मुळशी तालुक्यातील तरुण हाफ पिच क्रिकेटकडून फुल पीच क्रिकेट कडे आकर्षित झाला आहे.
-ऍड. मिलींद सणस, गोलंदाज भूगांव क्रिकेट क्लब
पुणे जिल्ह्यात मुळशी तालुका हाफ पीच क्रिकेट साठी केंद्र बनले होते. इतर ठिकाणी मात्र फुल पीच क्रिकेटजोरात होते. जागतिक क्रिकेट मध्ये स्थान मिळवायचे असेल तर फुल पीच क्रिकेट शिवाय पर्याय नव्हता. याच अनुषंगाने मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन स्थापन करून गावोगावच्या संघाची नोंदणी करण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या मेहनतीचे फळ आज मिळत आहे.
-हरी पाडाळे, फलंदाज म्हाळुंगे क्रिकेट क्लब