सातारा – राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) “नाथजल’ हे मिनरल वॉटर दोन वर्षापूर्वी राज्यातील सर्व आगारांमध्ये उपलब्ध केले. जिल्ह्यातील अकरा एसटी डेपोमध्ये आता प्रवाशांना शुद्ध पाणी मिळत असून या मिनरल वॉटरला प्रवाशांचा प्रतिसादही मिळत आहे. अकरा डेपोत एकाच वर्षात तब्बल 74 हजार 576 “नाथजल’ची विक्री झाल्याने एसटीच्या महसूलातही वाढ झाली आहे. या योजनेतून एसटी महामंडळाने स्वत:चे ब्रॅंडिंग केले आहे.
रेल्वे प्रशासन विकत असणाऱ्या रेलनीर मिनरल वॉटरच्या धर्तीवरच एसटी विभागानेही “नाथजल’ आणण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांना शुध्द पाणी देण्यासाठी एसटीच्या सर्व आगारांप्रमाणेच बाहेरील ठराविक विक्रेत्यांकडे “नाथजल’ उपलब्ध करून दिले. आगारांमध्ये “नाथजल’ची विक्री मोठ्या प्रमाणात होत असून शुद्ध पाणी मिळत असल्याने आगारांमध्ये “नाथजल’मुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न सुटत आहे. करोनानंतर हळूहळू एसटी सेवा मार्गावर येत आहे.
आगारांमध्ये बहुतांश प्रवासी “नाथजल’चा वापर करत आहेत. त्यामुळे एसटीच्या महसूलातही वाढ होत आहे. जिल्ह्यात डिसेंबर 2020 मध्ये विविध डेपोंमध्ये “नाथजल’चा उपक्रम सुरु झाला. जानेवारी ते डिसेंबर 2022 या एकाच वर्षात पाऊण लाख मिनरल वॉटरची विक्री झाली. माफक दरात प्रवाशांना शुध्द पाणी देण्याची योजना यशस्वी होत आहे. दरम्यान, नाथजल योजनेत एक लिटर पाण्याच्या बाटलीला 15 रुपये, 650 मिलीची बाटली 10 रुपये तर 500 मिलीच्या बाटलीसाठी 9 रुपये दर आकारला जात आहे. सुरुवातीला केवळ एक लिटरची पाण्याची बाटली उपलब्ध होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पाण्याच्या बाटल्यांचा आकार बदलण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.