वीसगाव खोरे -वीसगाव खोरे (ताण भोर) येथे गेल्या काही दिवसांपासून वेगाने हवामानात बदल होत असून, पहाटे थंडी, सकाळी कोवळे उन, दुपारी तीव्र उष्णता, सायंकाळी चारनंतर ढगाळ वातावरण आणि नंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस अशा सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी या विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने रुग्णांची उपचारासाठी दवाखान्यांमध्ये गर्दी होत आहे.
भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील धनावडेवाडी, शेरताठी, साळवी वस्ती, पाटणेवाडी, पाले, पळसोशी, धावडी, वरवडी खुर्द, वरवडी बुद्रुक, वरवडी डायमुख, पळसोशी, बाजारवाडी, भाबवडी, उत्रौली, हातनोशी, कान्हवडी या परिसरात रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने सरकारी, खासगी रुग्णालयात उपचारासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. भोर तालुक्यातील वीसगाव खोरे हा डोंगराळ दुर्गम भाग असून येथील बहुतांश लोक उपजीविकेसाठी शेती करतात.
शेतातील कष्टांची कामे, त्यामुळे होणारी दगदग आणि बदलते रोगट हवामानामुळे नागरिकांमध्ये आजार वाढू लागले आहेत. सध्या रब्बी हंगामातील ज्वारी काढणीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे शेतातील कामांची लगबग सुरू आहे. रात्री ज्वारी उपटणी केली जात आहे. दिवसभर कणसे कापण्याचे काम होते आहे. ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडण्याच्या भीतीने अशाही स्थितीत शेतकरी काम करीत आहेत.
वातावरणातील बदलामुळे सर्दी, थंडी, ताप, खोकला यांसारखे आजार झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी यावे. ज्येष्ठ नागरिकांची, लहान मुलांची काळजी घ्यावी .
डॉ. मिलींद अहिरे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, नेरे (ता. भोर)