मंचर -बोरघर (ता. आंबेगाव) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी बोरघर (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पंचायत समिती आंबेगावचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती सरपंच सीताबाई बांबळे यांनी दिली.
बोरघरच्या लोकसंख्येच्या निकषानुसार शासनाकडून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र याठिकाणी मंजूर असून, त्याची इमारत व कर्मचारी स्टाफ भरलेला आहे. आदिवासी दुर्गम भागातील हे गाव पेसा क्षेत्रात येत असून, 16 किलोमीटरच्या परिसरात दुर्गम डोंगराळ भागात 12 वाड्यावस्त्या आहेत.
येथील अनेक वाड्यावस्त्यांवरील घरापर्यंत जाण्यासाठी अद्याप रस्ते नसल्याने रुग्णाला उपचारासाठी घेऊन जाणे अवघड होत आहे. त्याचप्रमाणे येथील उपकेंद्रात एकच कर्मचारी कार्यरत असल्याने अपुरी आरोग्य सुविधा मिळत आहे.
अडिवरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचारासाठी पायपीट जावे लागत असल्यामुळे ग्रामसभेत ठराव घेऊन प्रशासनाकडे प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देताना उपसरपंच दादू उंडे, सरपंच सीताबाई बांबळे, किसन खामकर, मीरा खामकर, अजित वालकोळी उपस्थित होते.