यवत – कसबा व पिंपरी चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी व शिंदे गटात तुल्यबळ लढत होत आहे. मात्र, यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार, मूळचे दौंडचे असलेले रवींद्र धंगेकर आहे. धंगेकर यांच्या रूपाने दौंडला दुसरा आमदार मिळणार का, अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे. कडव्या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
कसबा विधानसभेची पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर तर भाजपाकडून हेमंत रासने यांच्यात अटीतटीचा सामना रंगला आहे. रवींद्र धंगेकर यांचे मूळ गाव नाथाचीवाडी हे असून त्यांची वडीलोपार्जित शेतजमीन व घर देखील तेथे आहे.
त्यांचे मूळ आडनाव हे झाडगे असून त्यांचे वडील हेमराज हे पुण्यात धंगेकर कुटुंबात दत्तक गेले आहेत. हेमराज हे सोने चांदीचे कारागीर म्हणून ओळखले जातात. व्यवसाय वाढवताना पुत्र धंगेकर यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले. ते स्वतः देखील सोने-चांदीच्या कारागिरीचा व्यवसाय करीत आहेत.
व्यवसायाबरोबर राजकारणात येऊन सामाजिक कार्य करण्याची त्यांना आवड निर्माण झाली. धंगेकर यांनी पुण्यातील कसबा प्रभागात जम बसवित नगरसेवक पदापर्यंत मजल मारली. त्यांनी शहरात विकासाकामांचा नेता, अशी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी आपल्या मूळ गावातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. धंगेकर यांनी कडवी लढत देत असल्याचा अभिमान गावकरी बाळगत आहेत.
गावकरी एकवटले
दौंड तालुक्यातील नाथाचीवाडी या गावात धंगेकर यांनी विविध विकासकामांना निधी मिळवून दिला आहे. गावच्या विविध कार्यक्रमात ते सहभागी होतात. महाविकास आघाडीकडून कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाथाचीवाडी गावात जल्लोष केला होता.
प्रचारात पहिल्या दिवसापासून नाथाचीवाडी ग्रामस्थ कसब्यात तळ ठोकून आहेत. दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल हे विद्यमान आमदार आहेत. धंगेकर यांच्या रूपाने तालुक्याला दुसरा आमदार मिळणार का, याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.