सविंदणे -शिरूर शहरातील नगरपरिषद व्यापारी संकुलाचे भूमिपूजन होऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाचे धर्मेंद्र खांडरे व स्थानिक भाजपा कार्यकर्ते, मनसे, शिवसेना यांनी आडकाठी आणल्यामुळे चक्क भूमिपूजन रद्द करण्याची नामुष्की राष्ट्रवादी पक्षावर ओढवली आहे. अधिकाऱ्यांना फोन करून भाजपाचे खांडरे यांनी बदलीची व निलंबन करण्याची धमकी दिल्यामुळे हे व्यापारी संकुलाचे भूमिपूजन झाले नसल्याचा आरोप आमदार अशोक पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे बड्या नेत्यांसह राष्ट्रवादीची शिरूर शहरात मोठी नाचक्की झाल्याची चर्चा रंगली होती.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख पोपट शेलार, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किरण आंबेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रवी काळे व कार्यकर्ते उपस्थित होते. शिरूर एसटी स्टॅंड येथे व्यापारी संकुलनाचे भूमिपूजन व भूमिका आयोजन करण्यात येणार होते. परंतु ते रद्द झाले आहे. त्यानंतर आमदार पवार यांनी त्याचा खुलासा केला.
आमदार पवार म्हणाले की, शिरूर शहरातील एसटी स्टॅंडजवळील जागेमध्ये अल्प उत्पन्न गटातील तरुणांसाठी ती संकुलनासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाच कोटी रुपयांचा निधी आला आहे. हा निधी परत जाऊ नये म्हणून हे काम सुरू करण्यासाठी घेतले होते. परंतु धर्मेंद्र खांडरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये खो आणून प्रशासकीय पातळीवर सत्तेचा उपयोग करून अधिकारी यांच्यावर दबाव तंत्र आणून त्यांना यासाठी एक जिल्ह्यासाठी नियम करून घेतला आहे, हे योग्य नाही. या अगोदरही पालकमंत्री हे अजित पवार होते.
त्यांच्या काळात विकास कामाच्या भूमिपूजनात आडकाठी आणली नाही. परंतु केवळ भाजपाचे कार्यकर्ते यांनी सध्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव पुढे करून कार्यक्रम होऊ दिला नाही.
शिवसेना तालुकाप्रमुख पोपट शेलार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी दिला असून हा निधी आणण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार यांनी मोठा निधी दिला आहे. याला विरोध भाजपा सरकारच्या बगलबच्चाने राजकारण केले आहे.