बेल्हे/नीरा – इतिहासामध्ये “काका मला वाचवा’ असे आपण वाचले आहे. पण पुरंदर तालुक्यातील वागदरवाडी येथे “काका मला मारू नका’ असे म्हणण्याची वेळ एका पुतण्यावर आली आहे. वागदरवाडी येथील काका पुतण्याचे जमिनीवरून वाद आहे. पुतण्या जमिनीत आल्याचे पाहून काकाने चक्क रॉकेल ओतून पुतण्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. 7) दुपारी घडली.
हातामध्ये पेटता टेंभा घेऊन तो पुतण्याच्या अंगावर मारतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर या पुतण्याची आई सुद्धा यामध्ये किरकोळ जखमी झाली आहे. याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात काकविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भास्कर त्रिंबक भुजबळ असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या काकाचे नाव आहे. शारदा नानासाहेब भुजबळ (रा. वागदरवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, या काका पुतण्याचे जमिनीवरून भांडण आहे. काकाने पुतण्याच्या जमिनीत अतिक्रमण करून ऊस लावला आहे.त्या ऊसाला तोड आल्यावर पुतण्याने हरकत घेतली; मात्र तरी देखील काकाने ऊस तोडण्याचा प्रयत्न केला.
ही ऊस तोड थांबवण्यासाठी पुतण्या आणि त्याची आई शेतात आले असता शनिवारी भास्कर भुजबळने पुतण्या स्वप्नील नानसाहेब भुजबळ यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याच बरोबर पेटत्या टेंभ्याने त्याला मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास जेजुरीचे पोलीस उपनिरीक्षक कुंडलिक गावडे करीत आहेत.