पुणे, दि. 22 -दिवाळी म्हटली की, कपडेलत्ते, फराळ, फटाके, आकाशकंदील, पणत्या याबरोबरच सोन्या-चांदीची खरेदी हे ओघाने आलेच. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दिवाळीच्या पाडव्याला अनेकजण चोख सोने-चांदी, त्याच्या वस्तू खरेदी करतात परंतु धनत्रयोदशीलाही मुख्यत्त्वे चांदीच्या वस्तूंची, देवांच्या मूर्तींची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. या वर्षी दिवाळीच्या पाडव्याच्या बरोबरीनेच धनत्रयोदशीलाही सोने-चांदी खरेदीसाठी सराफ बाजारात झुंबड पहायला मिळाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांनी खरेदी केली, की त्याचा विचारही सराफांनी केला नसावा. तशीच प्रतिक्रिया पुण्यातील सराफांनी दिली आहे. यावेळी सोने-चांदी खरेदीदारांमध्ये तरुण वर्गाची संख्या लक्षणीय वाढल्याचे निरीक्षण सराफांनी नोंदवले आहे. अगदी 21 ते 35-40 वयोगटातील युवक खरेदीसाठी आल्याचे सराफांनी सांगितले. या स्थितीमुळे सराफा बाजारात आनंदाचे वातावरण आहे.
यंदा सोन्याबरोबरच चांदीसाठी मागणी आहे. यामध्ये चांदीची नाणी, लक्ष्मीच्या मूर्तींचा समावेश आहे. याशिवाय सोन्यामध्ये मंगळसूत्र, पाटल्या अशा जास्त वजनाच्या दागिन्यांची मागणीही वाढली आहे. मागच्यावर्षीपेक्षा 25 ते 30 टक्क्यांनी खरेदी वाढली आहे. पाडव्याला ज्याप्रमाणे खरेदीसाठी गर्दी असते, तशी धनत्रयोदशीच्या दिवशी गर्दी झाली आहे. काहीजण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करतात तर काहीजण पाडव्याला. परंतु धनत्रयोदशीच्या दिवशीच पाडव्याला असते तेवढी गर्दी पहायला मिळाली. याशिवाय गेल्या चार दिवसांत सोन्या-चांदीचे भाव कमी झाल्याने अनेकांनी बुकींग केले होते. त्यांनीही या दिवशी त्यांचा ऐवज नेला आहे. करोनाच्या आधी ठराविक वयोगटातील लोक खरेदी करत होते, परंतु आता तरुणवर्गाची खरेदीदारामध्ये उपस्थिती जाणवली हे विशेष होते.
– अतुल अष्टेकर, केआरए ज्वेलर्स
सराफा व्यावसायिक आनंदी
यावर्षी धनत्रयोदशीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुख्य म्हणजे पाऊस थांबला आहे. गेल्या आठवडाभर पावसामुळे चांगलीच पंचाईत झाली होती. मात्र ऐन खरेदीच्या दिवशी उघडीप असल्याने त्याचा फायदा खरेदीदारांना आणि पर्यायाने सराफ बाजाराला झाला आहे. यंदा “यंग जनरेशन’ ग्राहकांची संख्या मोठी आहे. त्यांनी “लाइट वेट’ दागिन्यांना पसंती दिली आहे. त्यातल्या विविध प्रकारांची खरेदी तरुण करत आहेत.
– सिद्धार्थ शहा, चंदुकाका सराफ ज्वेलर्स
तरुण वर्गाची संख्या ग्राहकांमध्ये जास्त आहे, परंतु त्यांचा कल हा हिऱ्यांच्या खरेदीत जास्त आहे. याशिवाय टेम्पल ज्वेलरी आणि पारंपरिक पद्धतीच्या परंतु मॉडर्न लूक दिलेल्या दागिन्यांची मागणीही सर्वाधिक आहे. दिवाळीच्या आधीपासूनच गर्दीला सुरूवात झाली आहे. अनेकांनी आधीच बुकींग केले आहे.
– सुरेंदरपालसिंग बीर, नीळकंठ ज्वेलर्स
पाडव्यापेक्षा जास्त चांगला “रिस्पॉन्स’ धनत्रयोदशीला मिळाला आहे. सकाळपासूनच पेढ्यांमध्ये गर्दी सुरू झाली आहे. यावेळी विशेषत: तरुणपिढी खरेदी करताना पहायला मिळत आहे. यावर्षीची दिवाळी ही बाजारात खरेदीचा आनंद घेऊन आली आहे.
– वस्तुपाल रांका, रांका ज्वेलर्स