पुणे – महापालिकेकडून शहरात उघड्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पण, महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यांलयांकडून उड्डाणपुलाखालील कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पुलांच्या खालील बाजूस अस्वच्छता तसेच दुर्गंधी पसरत असून स्थानिक नागरिकांना अस्वछतेचा सामना करावा लागत आहे.
याबाबत नागरिकांनी महापालिकेकडे लेखी तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने नदीपात्र परिसदिर तसेच पुलाचा परिसर स्वच्छ करण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयास दिले. मात्र, त्यानंतर आठ दिवस झाले तरी कचरा तसाच पडून असल्याचे समोर आले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लकडी पुलाच्या दोन्ही बाजूंना अशीच स्थिती आहे.
या पुलाखाली कचरा साचल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते रूपेश केसेकर यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे केली. त्यानंतर प्रशासनाने कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयास ही माहिती कळली. मात्र, क्षेत्रीय कार्यालयाने वाहन विभाग स्पायडर मशीन देत नाही. हाताने कचरा उचलता येणार नाही, असे सांगत कचरा तसाच ठेवला.
त्यानंतर केसेकर यांंनी अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत तक्रार केली. अतिरिक्त आयुक्तांकडूनही घरकचरा व्यवस्थापन विभागास तसेच वाहन विभागास तत्काळ स्पायडर मशीन देण्याच्या सूचना केल्या. मात्र, त्यानंतर आता केसेकर यांनी थेट आयुक्तांकडे तक्रार केली असून, त्यानंतर तरी कचरा उचलला जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.