सातारा – सातारा पालिकेच्या हद्दवाढ भागातील मिळकतींचे सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे या मिळकतींचे फेरसर्वेक्षण करावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अॅड. सचिन तिरोडकर आणि नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी लाक्षणिक उपोषण केले.
यासंदर्भात जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हद्दवाढीनंतर शहरात समाविष्ट झालेल्या भागामध्ये चतुर्थ वार्षिक पाहणी होऊन, 2022-23 व 2023-24 या कालावधीची मालमत्ताकराची बिले या भागातील मिळकतधारकांना देण्यात आली आहेत.
पालिकेने केलेले सर्वेक्षण सदोष आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेची मुदत संपल्याने अपील समिती गठीत नाही. त्यामुळे मागील वर्षाच्या कर आकारणीला शासनाने स्थगिती दिली आहे. तसेच यावर्षी विशेष शिबिरात झालेल्या मालमत्ता कराबाबतच्या तक्रारींवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे हद्दवाढ भागातील मिळकतधारकांना दिलासा मिळावा. यावेळी धनंजय जांभळे, रवी पवार, किशोर पंडित, आशा पंडित उपस्थित होत्या.