पुणे – शहरातील कचरा संकलनाचे काम सकाळी १० वाजेच्या आत पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेकडून सुरू आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, वाहने तसेच इतर सामग्री खरेदीचे नियोजन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती मनपा अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार यांनी दिली.
सध्या कचरा संकलनाचे काम दुपारी १ ते २ वाजेपर्यंत केले जाते. तर शनिवारी, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी हे काम अत्यावश्यक सेवेत येत असतानाही बंदच ठेवले जाते. त्यामुळे या काळात शहरात कचरा वाढून त्याचा ताण सोमवारच्या संकलनावर येतो. ही बाब लक्षात घेऊन सुट्टीच्या दिवशीही कचरा संकलनासह इतर दिवशीही सकाळी दहाच्या आत कचरा संकलन करून तो प्रक्रिया पाठविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
शहरात सध्या दररोज सुमारे २,२०० टन कचरा तयार होतो. स्वच्छ संस्था तसेच इतर संस्थांच्या माध्यमातून हा कचरा संकलित करून तो हस्तांतरण केंद्रावर आणला जातो. तिथून तो प्रक्रिया प्रकल्पासाठी पाठवला जातो. हे काम पहाटेपासून सुरू केल्यानंतर ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू असते. त्यामुळे अनेकदा हाॅटेलमधील तसेच संकलित केलेला कचरा फीडर पाॅइंटवरच पडून असतो. त्यामुळे शहरात अस्वछता दिसते. यावर तोडगा म्हणून कचरा संकलनाच्या ढकलगाड्या तसेच घंटागाड्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.
घंटागाड्यांची संख्या वाढवणार
महापालिकेकडे सध्या कचरा संकलन व वाहतुकीसाठी सुमारे ७५० वाहने आहेत. ही संख्या आणखी २०० ते २५० ने वाढविली जाणार आहे. सध्या २४० छोट्या घंटागाड्या आहेत. घरोघरी व रस्त्यावरल कचरा सकाळी लवकर गोळा केल्यानंतर हा कचरा वाहून नेण्यासाठी ही वाहने अपुरी पडत आहेत. एकाच गाडीला दोन ते तीन फेऱ्या माराव्या लागत असल्याने रॅम्पवर कचरा पोहचविण्यास उशीर होत आहे. त्यामुळे घंटा गाड्यांची संख्या वाढविल्यास सकाळी १० पर्यंत संपूर्ण कचरा उचलून तो रॅम्पवर पोहचविणे शक्य आहे.