पुणे – महापालिकेच्या ताब्यात आलेल्या मैदानांसाठी रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक नसल्याने अशा मैदानांचा रात्रीच्या वेळी मद्यपान तसेच नशा अशा अवैध कामांसाठी वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या खराडी येथील सर्वे क्र. 73 मधील खेळाच्या मैदानाच्या ठिकाणी महात्मा गांधीच्या जयंती निमित्त आयोजित स्वच्छता मोहिमेत शाळेच्या आवारात चक्क गांजाची झाडे आढळून आली.
माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह या भागातील माजी नगरसेवक, सामाजिक संस्था तसेच राजकीय कार्यकर्त्याच्या वतीने स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी या मैदानात चक्क गांजाची झाडे मोठ्या प्रमाणात उगवल्याचे आढळून आले. रात्रीच्या वेळी या ठिकाणी अनेक युवक गांजा ओढत असल्याने त्यावेळी बिया पडून ही झाडे उगवल असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, या प्रकारामुळे महापालिकेच्या मैदानांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
मैदानांची सुरक्षा वाऱ्यावर…
महापालिकेकडून विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीत शहरातील आरक्षित जागा तसेच ऍमेनिटी स्पेस अंतर्गत मिळालेल्या जागा ताब्यात घेतल्या जातात, या जागांना सीमाभिंत तसेच गेटही बसविण्यात आलेले असते. तसेच, स्थानिक नागरिकही त्याचा वापर करत असतात. मात्र, या मैदानांसाठी महापालिका सुरक्षारक्षक नेमत नसल्याने रात्रीच्या वेळी संबंधित परिसरातील नशेबाजांकडून अशा मैदानाचा गैरवापर केला जात आहे.
त्यामुळे, महापालिकेने अशा ठिकाणी सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे ठरू लागले आहे. परंतु, सुरक्षारक्षक नसल्याचे सांगत महापालिका अशी मैदाने खासगी संस्थाना चालविण्यास देते. मैदाने खासगी व्यक्तीच्या ताब्यात गेल्यास खेळण्यास जागाच राहणार नाही, या कारणातून आपल्या परिसरातील मैदानावर गैरप्रकार घडत असले तरी पालिकेकडे तक्रार करण्यास नागरिक टाळाटाळ करतात.