पुणे – महापालिकेकडून शहरातील विकासकामांच्या निविदा काढताना सुशिक्षित बेरोजगार (सु.बे.) अभियंत्यांनाही या निविदा भरण्यासाठी संधी मिळावी यासाठी अनेक निविदांमध्ये कामाच्या अनुभवाची अट रद्द केली जाते. मात्र, ही कामेही मोठे ठेकेदार कमी दराच्या निविदा भरवून पळवत असल्याने या अभियंत्यांना कामेच मिळत नसल्याने महापालिकेने सुबेंसाठी स्वतंत्र निविदा काढाव्यात, अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या वतीने महापालिकेकडे पत्राद्वारे केली आहे.
महापालिकेने शहरात एका बाजूला ठेकेदार नोंदणीची अट रद्द केल्यानंतर अनेक नवीन अभियंता ठेकेदार म्हणून पुढे येतील, अशी शक्यता वर्तविली जात असताना, ही कामे काम सुबेना मिळण्याऐवजी अभियंते नसलेले लोक प्रतिनिधींचे कार्यकर्तेच पळवित असल्याचे चित्र आहे. दरम्यान, महापालिकेकडून वर्षभराकाठी लहानमोठ्या अशा जवळपास पाच ते सहा हजार निविदा काढल्या जातात.
अटी शिथिल तरीही “बेरोजगार’
महापालिकेच्या विकासकामांमध्ये जास्तीत जास्त निविदाधारक सहभागी झाल्यास चांगल्या दर्जाची स्पर्धा होऊन विकासकामे होतील, ही अपेक्षा ठेऊन महापालिकेने अनेक कामांच्या निविदांमध्ये अनुभव तसेच कामाच्या आर्थिक निकषांमध्ये सुबेसांठी सवलत दिली आहे. परिणामी, बेरोजगारांना काम मिळावे तसेच अभियंता संवर्गातील ठेकेदार पुढे यावेत, असा साधा उद्देश आहे.
मात्र, ही निविदा सर्वांसाठी असल्याने त्यात, महापालिकेचे मोठे ठेकेदार सहभागी होऊन कामाच्या निविदा थेट 40 ते 45 टक्के कमी दराने भरतात. त्याचवेळी, कामांचा दर्जा चांगला असावा या उद्देशाने कामाचे स्वरूप, त्याचा खर्च याचा अभ्यास करून निविदा भरणाऱ्या सुबेच्या निविदा 10 ते 15 टक्के कमी दराच्या असतात. अशा वेळी सुबेसाठी शिथील केलेल्या अटीचा फायदा मोठे ठेकेदार किंवा लोकप्रतिनिधीचे कार्यकर्ते घेतात. तसेच दुसऱ्यांना कामे दिली जातात. यावेळी ठेकेदाराची शैक्षणिक गुणवत्ता तपासली जात नाही.
स्वतंत्र निविदा काढण्याची मागणी
दरम्यान, सुबेंना महापालिकेची कामे मिळत नसल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्याची मागणी सुशिक्षित रोजगार अभियंत्यांच्या वतीने शिवशंकर मुळे यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. अशा निविदांमध्ये इतर मोठे ठेकेदार सहभागी न झाल्यास बेरोजगारांना काम मिळेल तसेच या निविदा थेट अभियंतेच भरणार असल्याने कामाचा दर्जा वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे, या पत्राची दखल घेत तातडीनं कामे मिळावित अशी मागणी मुळे यांनी केली आहे.