पुणे- करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पालिका यंदा फक्त फिरते विसर्जन हौद उपलब्ध करून देणार आहेत. मात्र, प्रशासनाने प्रत्येक प्रभागात स्थिर विसर्जन हौद, तसेच मूर्ती संकलन केंद्र उपलब्ध करावीत, अशी मागणी भाजप नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
शहरात गेल्या दोन वर्षांपासून करोना संकटामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावर मर्यादा आली असली, तरी घरगुती गणेशमूर्तींची संख्या वाढली आहे. मात्र, मागील वर्षी गणेशोत्सवानंतर करोना संसर्ग वाढल्याने यंदा महापालिका सर्व विसर्जन घाट बंद ठेवणार आहे.
कोठेही स्थिर विसर्जन हौद ठेवण्यात येणार नाहीत. त्याऐवजी शहरभर फिरते विसर्जन हौद असतील. मात्र, शहरातील वस्ती-सोसायट्या तसेच दाट लोकवस्ती भागात गणेशमूर्ती विसर्जनासाठी येत असतात.
त्यामुळे महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या या हौदांची वाट पाहत ताटकळत थांबावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने स्थिर हौदांसह, मूर्ती संकलन व निर्माल्य संकलनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी चोरबेले यांनी केली आहे.