अटक केलेल्या सायबर चोरट्यांकडून गावठी कट्टा आणि सहा जिवंत काडतूस जप्त
पुणे – कोथरूड येथील बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयातील अकाउंट विभागात फोन आणि मेसेज करून कंपनीचा संचालक बोलते असल्याचे सांगून 66 लाख, 41 हजार रुपयाचा गंडा घालणाऱ्या आणखी दोघांना सायबर पोलिसांनी बिहार येथून अटक केली आहे.
बेलाल शाबीर अन्सारी (21), कामरान इमतीयाज अन्सारी (23, दोघेही रा. इजमायली, पो. लखाडी दरगाह, ता. बहरिया, ता. सिवान, बिहार) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यापूर्वी बिशाल कुमार भरत (21, रा. लकरी खुर्द, सिवान, बिहार) या आरोपीला अटक करण्यात आली होती. या आरोपींकडून 8 मोबाईल, 36 सिम,19 एटीएम कार्ड, 2 चेकबुक जप्त करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या आरोपींकडून 1 गावठी कट्टा आणि 6 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
फिर्यादी हे कोथरूड भागात एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात अकाउंट विभागात काम करतात. सायबर चोरट्यांनी ऑफिसच्या फोनवर संपर्क करत कंपनीचा संचालक बोलतोय, असे सांगून विविध बॅंक खात्यात 66 लाख 41 हजार 522 रुपये पाठवण्यास भाग पाडले होते.
सायबर चोरट्यांनी वापरलेले मोबाईल, इमेल आयडी, पेमेंटच्या लिंक व एटीएम मशीनमधील सीसीटीव्ही फुटेज तपासात चोरटे बिहारमधील सिवान जिल्ह्यातील इजमाली येथील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुपे-पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खरात, अंमलदार दत्तात्रय फुलसुंदर, अश्विन कुमकर, प्रवीणसिंग राजपूत यांच्या पथकाने कारवाई केली.
या सायबर चोरट्यांनी पुण्यातील अजून एका व्यक्तीची 40 लाखांची आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच या सायबर चोरट्यांवर हैद्राबाद आणि पंजाबमध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.
साध्या वेषात जाऊन केली अटक
सायबर चोरट्यांनी गावात वॉच टॉवर उभे केले होते. गावात नवीन कोणी येत तर नाही ना यावर हे लक्ष ठेऊन असायचे. यामुळे यावेळी कारवाई करतांना पुणे पोलिसांनी नवीन शक्कल लढविली होती. आरोपींना ओळखायला येऊ नये म्हणून दाढी वाढवूनच, थ्री फोर्थ-पॅण्ट घालून रात्री 8 वाजता गावात जाऊन आरोपीना बेड्या ठोकल्या.