सातारा -राष्ट्रीय महामार्गावर भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोपेगावच्या (ता. वाई) हॉटेल कोहिनूर येथे ट्रॅव्हल्स बसमधून एका व्यापाऱ्याची 22 लाखांची रोकड असलेली बॅग चोरुन नेणाऱ्या मध्यप्रदेशातील चोरट्याला जेरबंद करण्याची कामगिरी भुईंज पोलीस व सातारा स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे केली आहे. या चोरीतील 18 लाख रुपये हस्तगत करण्यात यश मिळाले आहे. रज्जब हसन खान, (वय 41, रा. सिंधीमोहल्ला, धरमपुरी, जि. धार, राज्य मध्यप्रदेश) असे या प्रकरणी अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दि. 26 सप्टेंबर रोजी या घटनेतील फिर्यादी नरेंद्र प्रल्हादसिंग गिरासे (वय 42, रा. भैरवनाथनगर, धानुरी रोड, विश्रांतवाडी, पुणे) हे एका खासगी ट्रॅव्हल बसमधून प्रवास करत होते. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही बस बोपेगाव येथील हॉटेलवर थांबली असताना ते नाष्टा करण्यासाठी खाली उतरले होते. नेमके याच दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची मशिनरी विक्रीतून आलेली 22 लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग चोरुन नेली होती. याबाबत भुईंज पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली होती.
या गुन्ह्यातील संशयितांना पकडण्याबाबत वरिष्ठांनी सूचना केल्या होत्या. मात्र, गुन्हयातील आरोपी हे अज्ञात असल्याने त्यांना निष्पन्न करण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते. त्यासाठी भुईंज पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स्वतंत्र पथक तपास करत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेची टीम देखील या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होती.
केवळ तांत्रिक तपासाच्या आधारे परराज्यातील संशयिताला शोधून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करुन रोख 18 लाख रुपये हस्तगत करण्याची उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. या कारवाईत भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे, पोलीस अंमलदार शरद बेबले, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, रोहित निकम, विशाल पवार, सचिन ससाणे, नितीन जाधव, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, किरण निंबाळकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.