पुणे – राज्यभरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या (सोसायटी) सदस्यांच्या तक्रारी ऑनलाइन माध्यमातून सोडविण्यासाठी सहकार संवाद संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून सोसायटीशी निगडित सर्व समस्यांबाबत रहिवाशांना घरबसल्या तक्रार नोंदविता येणार आहे. या संकेतस्थळावर आलेल्या तक्रारी दोन महिन्यात निकाली काढण्याच्या सूचना सहकार विभागाने सर्व जिल्हा निबंधकांना दिल्या आहेत.
राज्यात सुमारे एक लाख पंधरा हजार नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. त्यात राहणाऱ्या सभासदांची संख्या सुमारे पंधरा लाखांच्या पुढे आहे. या सभासदांना किंवा अध्यक्षांना महापालिका, महावितरण, पोलिस किंवा सभासदांमधील अंतर्गत वाद अशा तक्रारी सहकार विभागाकडे कराव्या लागतात. मात्र, पोलिसांशी संबंधित तक्रार असल्यास ती सहकार आयुक्तालयात स्वीकारली जात नाही. त्याच पद्धतीने सहकार विभागातील तक्रार पोलिसांकडे देऊन चालत नाही.
महापालिका, महावितरणशी संबंधित तक्रारी त्या- त्या विभागाकडेच कराव्या लागतात. त्यामुळे सभासदांना किंवा अध्यक्षांना या विभागांमध्ये चकरा माराव्या लागतात. सोसायटीपासून दूरच्या भागात असलेल्या अशा कार्यालयांमध्ये जाण्यासाठी ज्येष्ठ सभासदांना, तसेच अध्यक्षांना मोठा वेळ लागतो. संबंधित कर्मचारी, अधिकारी जागेवर भेटेल किंवा सभासदाने आणलेल्या तक्रारीला संबंधित कर्मचारी अधिकारी योग्य तो प्रतिसाद देईल, याची शक्यता कमी असते.
त्यानंतर तक्रारी संदर्भात पाठपुरावा करणे प्रत्येक सभासदाला किंवा अध्यक्षांना वेळोवेळी शक्य होत नाही. यावर तोडगा म्हणूनच महाराष्ट्र राज्य हाउसिंग फेडरेशन व सहकार आयुक्तालयाने सर्व सभासदांच्या व संस्थांच्या तक्रारींच्या निवारणासाठी सहकार संवाद या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.