पुणे – अमली पदार्थ जप्तीनंतर ललित पाटील याच्याभोवती बंदोबस्त वाढवण्यात आला होता. एक पोलीस उपनिरीक्षक आणि चार पोलीस कर्मचारी त्याच्या वॉर्डबाहेर होते. ललित पाटीलकडे अमली पदार्थ सापडताच त्याच्या हर्नियाच्या शस्त्रक्रियेचे नियोजन ससून प्रशासनाने अचानक मंगळवारी केले. यासाठी सोमवारी सकाळी त्याला सोनोग्राफीसाठी नेण्यात आले.
तर, सायंकाळी साडेसातच्या सुमारास एक्स-रेसाठी बाहेर नेण्याचा कॉल देण्यात आला. मात्र, बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यास नकार दिला. “आरोपीकडे अमली पदार्थ सापडले असल्याने सुरक्षेचा प्रश्न आहे, शस्त्रक्रियेच्या काही तास अगोदर तपासणीसाठी न्या’ असा पोलिसांनी पवित्रा घेतला.
मात्र, तेथील वैद्यकीय तज्ज्ञांनी अर्धा तास वाद घालत त्याला एक्स-रेसाठी वॉर्डमधून बाहेर काढले. सोबत दोन पोलीस बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले. मात्र, दुसरा पोलीस तयार होऊन येईपर्यंत वैद्यकीय पथकाने त्याला एकाच पोलिसाच्या बंदोबस्तात तळमजल्याकडे नेले.
तेथेच ललितने पोलिसाला धक्का देत पळ काढला. यावेळी ससूनच्या स्टाफपैकी कोणही मदतीला गेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, यासंदर्भात ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्यात आला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
पळालेला ललित फिरुन पुन्हा आला ससूनच्या परिसरात
ललित ससूनमधून पळाल्यावर अलंकार चौकातील लेमन ट्री हॉटेलच्या कंपाऊंडमध्ये लपला. दरम्यान, त्याच्या बंदोबस्तात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याच्या मागे धावण्याऐवजी आधी आपली दुचाकी शोधून मग पाठलाग सुरू केला. थोड्यावेळाने ललित कंपाऊंडबाहेर येऊन एका कार चालकापाशी गेला.
त्याला “मी खूप थकलो आहे, येथून पुढच्या कुठल्याही चौकात सोडा’ असे सांगितले. कारचालक आप्पा बळंवत चौकात जाणार होता. कार ससूनजवळील बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोरील बोल्हाई चौकात फिरुन आल्यावर तो तेथे उतरला. यानंतर त्याने एक रिक्षा केली. आता पोलीस या रिक्षाचा माग काढत आहेत.