योगेश गांगर्डे
कर्जत – तालुक्यातील कोंभळी येथे गावाच्या वैभवात भर टाकणारी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत झाली असून बोटावर मोजण्याइतक्या कर्मचाऱ्यांसह हे आरोग्य केंद्र सुरू झाले आहे. मात्र आरोग्य केंद्र बंद झाल्यानंतर ही जागा दारुड्यांचा अड्डा बनल्याने नागरिकांडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
भव्य दिव्य अशी आरोग्य केंद्राची इमारत कोंभळी च्या वैभवात भर घालणारी आहे फ मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात अपुरे कर्मचारी आहेत, सर्व विभाग सुरू झालेले नसल्याने, परिसरात असलेले घाणीचे साम्राज्य, दारुड्यांचा अड्डा बनल्याने ही इमारतच व्हेंटिलेटरवर गेली आहे.
कोंभळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम 2,30, 38,972 इतकी होती. 12हजार स्केअर फुटाचे बांधकाम असलेल्या आरोग्य केंद्रामध्ये ओपीडी, ड्रेसिंग रूम, ऑपरेशन थिएटर, जनरल वॉर्ड, हॉल या सुविधा आहेत. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक (पु.), आरोग्य सहायक (स्त्री.),सहाय्यक परिचारीका प्रसविका, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सहायक (पु.), स्त्री परिचर,पुरुष परिचर, वाहनचालक व बाह्ययंत्रणेकडून घेण्यात येणार सफाई कामगार अशी एकूण 15 पदे मंजूर आहेत. याबाबतचा शासन निर्णय 7 जून 2021 रोजी झाला. मात्र प्रत्यक्षात या आरोग्य केंद्रात आरोग्य सहायक , स्त्री परिचर असे दोनच कर्मचारी आहेत. तसेच उपकेंद्रातील सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, अर्थवेळ परिचारिका हे कर्मचारी या आरोग्य केंद्रात असतात.
गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत असून या केंद्रात मंजूर असलेली पदे न भरल्याने कोंभळी परिसरातील नागरिकांना सेवा सुविधा उपलब्ध होत नाहीत , त्यामुळे संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन कर्मचारी ऊपलब्ध करून द्यावेत.
ज्योती दरेकर, सरपंच, कोंभळी