नगर – तरूणाने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या सोबत लव इन रिलेशनशिप मध्ये राहिला. तिच्या सोबत शरीर संबंध ठेवले. दरम्यान, तरूणाने व त्याच्या नातेवाईकांनी युवती दुसऱ्या जातीची असल्याचे सांगून लग्न करण्यास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. नेवासा तालुक्यातील पीडित युवतीने याप्रकरणी सोमवारी (दि. 2) तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीवरून नवनाथ हरीभाऊ राऊत (रा. नांदूर, ता. आष्टी, जि. बीड) या तरूणा विरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवासा तालुक्यातील युवती नगर शहरात राहत असल्याने व राऊत याने तिला काम पाहून दिल्याने त्यांची ओळख झाली होती. युवती नगर शहरातील एका कापड दुकानात काम करत असल्याने राऊत तिला भेटण्यासाठी त्या दुकानात जात होता.
त्याने तिचा मोबाईल नंबर घेतला. दोघांचे एकमेकांवर प्रेम झाल्याने त्यांनी लव इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. राऊत याने युवतीला लग्नाचे आमिष दाखविले व तिच्या सोबत रूमवर राहून वेळोवेळी शरीर संबंध ठेवले. दरम्यान, 17 सप्टेंबर 2023 रोजी राऊत याची बहिण व तिचा पती रूम वर आले. ती युवतीला म्हणाली, तुम्ही कास्ट (जात) वेगळी आहे, तु माझ्या भावाला विसरून जा. त्यावेळी युवतीच्या लक्षात आले की, नवनाथ राऊत याने लग्नाचे खोटे आमिष दाखवून वारंवार शरीर संबंध ठेवून फसवणूक केली.