पुणे (संजय कडू)- 101… अग्निशमन दलाचा हा दूरध्वनी बहुतांशवेळा हे प्राणी आणि पक्ष्यांची सुटका करण्यासाठी केला जातो. यामुळे पाच वर्षांत तब्बल 2 हजार 846 प्राणी आणि पक्ष्यांची सुटका अग्निशमन दलाने केली आहे. नुकतीच आग लागलेल्या घरातून पर्शियन प्रजातीच्या दहा मांजरांची सुटका केल्यानंतर ही माहिती उघडकीस आली आहे.
शहरातील अग्निशमन दलाचे कार्य फक्त आग नियंत्रणापुरतेच मर्यादित नाही. आगीतून नागरिकांचे जीव वाचवण्याबरोबरच प्राणी आणि पक्षांची धोकादायक ठिकाणांहून सुटका करुन त्यांचे जीव वाचवणे हेही कार्य अग्निशमन दलाकडून केले जाते. प्राणी आणि पक्ष्यांचे जीव वाचवण्यासाठी अग्निशमन दलातील जवाणांना जीवाची बाजी लावण्याच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत. पक्षी झाडांवरील मांजात (पतंगाच्या धाग्यात) किंवा विजेच्या खांबाच्या तारांमध्ये अडकतात तर मांजर, कुत्रे, गायी आणि इतर प्राणी इमारतींच्या छतावर, इमारतीच्या भिंतीवर, ड्रेनेज चेंबर्स, विहिरी आणि इतर ठिकाणी अडकून राहतात. ही ठिकाणे धोकादायक असतात. यामुळे सर्वसामान्य नागरिक प्राणी आणि पक्षांना वाचवण्याच्या भानगडीत पडत नाहीत. यामुळे साहजिकच नागरिक अग्निशमन दलाला कॉल करुन माहिती देतात.
अनेक बचाव कार्यात आघाडीवर असणारे फायरमन राजाराम केदारी म्हणाले, “कॉल आल्यावर आम्ही आमच्यासोबत सर्व आवश्यक सुरक्षा उपकरणे घेऊन जातो. आमच्यासाठी प्रत्येक ऑपरेशन धोकादायक असते. झाडावर चढायचे असेल तर ते कोणत्या प्रकारचे झाड आहे हे आधी समजून घ्यावे लागते. ते झाड नाजूक किंवा खोडावर कुजलेले नसावे. जर झाड मजबूत असेल, तर चढायला सोपे असते आणि तो तुमचे वजनही तोलू शकते. झाडावर चढल्यानंतर, पक्षी ज्या मांजात किंवा तारेत अडकतो, त्याला अधिक इजा न करता आम्ही तो कट करतो. जर त्याला वैद्यकीय मदतीची आवश्यकता असेल तर त्याला संबंधीत उपचार करणाऱ्या ठिकाणी किंवा कात्रज प्राणी उद्यानात पाठवले जाते. त्याला जखम नसेल तर पुन्हा आम्ही त्याला मोकळे सोडतो. कुत्रा किंवा मोठ्या प्राण्याला वाचवताना आम्ही डोके थंड ठेऊन काम करतो. अडकलेल्या कुत्र्याने किंवा प्राण्याने आपल्याला चावता कामा नये किंवा आपल्याला हल्ला कामा नये याकडे लक्ष देतो. तसेच प्राण्याला आणखी इजा होणार नाही याची खबरदारी घेतो.’
“आमच्यासाठी प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. आमच्या नियंत्रण कक्षाला नागरिकांकडून किंवा प्राणीप्रेमींकडून आपत्कालीन कॉल आल्यानंतर, कोणताही वेळ न घालवता, आम्ही घटनास्थळी धाव घेतो. आमच्या माणसांचा जीव धोक्यात न घालता आम्ही बचाव कार्य करतो. कोणतीही दुखापत न होता. अडकलेले प्राणी आणि पक्षांची सुटका करतो. प्राण्यांचा शोध आणि बचाव कार्य करण्यासाठी आमच्याकडे सर्व प्रकारची उपकरणे आहेत.
– सुनील गिलबिले, अग्निशमन दलाचे प्रमुख (अतिरिक्त)