पुणे – राज्यात गेल्या सहा दिवसांपासून ओमायक्रॉन च्या एकाही रुग्णाचे निदान झाले नाही. त्यामुळे राज्यात गेल्या महिन्याभरापासून वाढत असलेली ओमायक्रॉन बाधितांची संख्या ओसरत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात डिसेंबरच्या अखेरपासून करोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य खात्याने नोंदवले होते.
करोनाचा नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांचे प्रमाण त्यात सर्वाधिक होते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ही रुग्णसंख्या वेगाने वाढली. कुटुंबच बाधित होण्याचे प्रमाण जास्त होते. त्यात लहान मुलांचाही यावेळी समावेश होता. त्यामुळे शहरात
भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर सरकारने काही निर्बंध घातले. मात्र, करोनाचा ओमायक्रॉन हा सौम्य असल्याचे दोन आठवड्यानंतर दिसू लागले. त्यामुळे निर्बंध पुन्हा शिथिल करण्यात आले, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.