पुणे – सवाई गंधर्व महोत्सवात रविवारी सायंकाळी अचानक आग लागली. महोत्सव मंडपाच्या मागील बाजूस असलेल्या पडद्यावर तार तुटून पडल्याने तेथील कापडाने पेट घेतला. दरम्यान सुरक्षेच्या सर्व उपाययोजना जागीच उपलब्ध असल्याने आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले असून मोठी दुर्घटना टळली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. कार्यक्रमस्थळी असणाऱ्या इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन मंडपामधील कापडाने पेट घेतला होता. त्याक्षणी तिथे उपस्थित असलेले नागरिक केदार केळकर यांनी अग्निरोधक उपकरणचा (फायर एक्स्टिंग्युशर) वापर करुन आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी घटनास्थळी बंदोबस्तावर तैनात असलेली अग्निशमन दलाची फायरगाडी व जवान यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवत आग इतरत्र पसरु न दिल्याने मोठा धोका टळला.
काही मिनिटांत आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले. या कामगिरीत बंदोबस्तावर तैनात असलेले अग्निशमन दलाचे वाहन चालक बिजू वाघमारे, जवान संदिप घडशी, रवी बारटक्के, ज्ञानल तारु, अक्षय चव्हाण यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, संगीतप्रेमी पुणेकरांसाठी पर्वणी असलेल्या सवाई गंधर्व महोत्सवाला गुरुवारी (14 डिसेंबर) पासून सुरु झाली होती. 68 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुलात हा महोत्सव सुरु होता. 14 ते 18 डिसेंबर असे चार दिवस महोत्सवाचे आयोजन आहे.