खडकवासला : आज रविवार (१७) सुट्टीच्या दिवशी सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावर चिंचेच्या बना जवळ प्रवासी वाहतूक करणारी जीप पलटी होऊन बारा पर्यटक जखमी झाले. सुदैवाने दरीत जीप गेली नाही त्यामुळे मोठी जिवीतहानी टळली. आजच्या दुर्घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेसह वाहतूक नियोजनकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष पुन्हा अधोरेखित झाले आहे.
सायंकाळी पाच वाजण्याच्या ही घटना घडली. वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील,वनरक्षक बळीराम वाईकर, संदीप कोळी व सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. पर्यटकांच्या मदतीने जखमी पर्यटकांना तातडीने सिंहगड रस्त्यावरील श्रीयश हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.
जयश्री गावडे (३२) , अस्मा पठाण ( २५ ), दक्षा गोमपाटील (३७), शशिकला यादव (३२) सर्व राहणार मुंबई या चार जणांवर उपचार करण्यात आले. त्यानंतर ते निघून गेले असे डॉ. आशीष पाटील यांनी सांगितले.
इतर पर्यटक किरकोळ जखमी झाले आहेत. प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप मधुन पर्यटक गडावरुन खाली येत असताना जीप पलटी झाली. या प्रकरणी चौकशी सुरू आहे असे हवेली पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार एस.ए.गिरे यांनी सांगितले.
तसेच, आज सकाळीही दुसरी एक प्रवासी जीप वाहनतळा जवळ कठड्याला धडकली. सुदैवाने जीप संरक्षक कठड्याला धडकुन जागीच थांबली मोठी दुर्घटना टळली आहे. या जीप मध्ये विद्यार्थी होते त्यातील एक मुलगी जखमी झाली.
काही खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने परिवहन नियमावली नुसार कालबाह्य झाली आहेत. असे असताना राजरोसपणे किल्ल्याच्या अत्यंत दुर्गम व धोकादायक घाट रस्त्यावर या वाहनांतुन पर्यटकांची वाहतूक सुरू असल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे.
सिंहगड घाट रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून कारवाई करावी यासाठी पुणे परिवहन विभाग व पोलिसांकडे वांरवार मागण्या करुनही अद्यापही दखल घेतली नाही असे वनविभागाने स्पष्ट केले आहे. आज दोन घटना घडल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला.
आज गडावर देशभरातील वीस हजारावर पर्यटकांनी गर्दी केली होती. दिवसभरात गडावर २१२१ वाहने तसेच दोनशेहून अधिक इतर वाहने गेली. दुपारी बारा वाजताच गडावरील वाहनतळ हाऊसफुल्ल झाला त्यामुळे वाहनतळा पासून थेट घाट रस्त्या पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.