अग्निशमनदलाचा कर्मचारी बाधित…..
पुणे(प्रतिनिधी) : महापालिकेच्या मुख्य इमारतीत अखेर करोनाने शिरकाव केला आहे. पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात कार्यरत असलेल्या अग्निशमनदलाच्या जवानास करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्षात तातडीनं औषध फवारणी करण्यात आली असून या विभागातील सर्वांची चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, हा विभाग महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाच्या वरच कार्यरत आहे. दरम्यान, या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या 8 जणांचे करोनाचे तपासणी नमुने घेण्यात आले असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले.
महापालिकेच्या चौथ्या मजल्यावर पालिका आयुक्तांचे कार्यालय आहे. तर पाचव्या मजल्यावर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयातून सध्या करोना बाधीत रूग्णांचे ट्रेसिंगचे काम सुरू आहे. तसेच शहरात तातडीची मदत पुरविण्याची जबाबदारी या विभागावर आहे. या शिवाय, या कक्षातून आता पावसाळयात पूर नियंत्रण कक्ष सुरू असणार आहे. तर आपत्ती व्यवस्थापन कक्ष असल्याने तो 24 तास सुरू असतो. या ठिकाणी या कक्षाच्या कर्मचाऱ्यासह अग्निशमनदलाचा एक कर्मचारी, एक पोलीस कर्मचारी तसेच सुरक्षा विभागाचे कर्मचारी 3 शिफ्ट मध्ये कार्यरत असतात.
हा अग्निशमनदलाचा जवानही या ठिकाणी कार्यरत होता. अग्निशमनदलाकडून एका कर्मचाऱ्यास लागन झाल्याने या विभागाने सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या तपासणीत हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचारी बाधित झाला असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या कर्मचाऱ्यास करोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने तो नियमित कामावर येत होता. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांना बाधा होण्याची दाट शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
महापालिकेच्या मुख्य इमारतील मागील दोन दिवसांपासून करोनाला प्रतिबंध करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर सॅनिटायझर तसेच ताप तपासणी करण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले होते. मात्र,आता हे सर्व बंद असून पालिकेत नागरिकांची वर्दळ वाढली आहे. तसेच सोशल डिस्टंन्सही पाळले जात नसल्याने मुख्य इमारतीला करोनाचा धोका असल्याचे वृत्त दैनिक प्रभातने तीन दिवसांपूर्वीच दिले होते. त्यानंतर आता हा कर्मचारी बाधित असल्याने इमारतीमध्ये करोना प्रसार रोखण्याची साधणे तातडीनं उपलब्ध करून देणे आवश्यक असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.