पुणे, (अंजली खमितकर) – गेल्या निवडणुकीतील प्रभाग 15, 29 चा काही भाग मिळून यावेळी प्रभाग 17 तयार झाला आहे. फेरफारीच्या आधीचा हा प्रभाग 15 आहे. हा भाजपचा बालेकिल्ला असल्याने या ठिकाणी चारही नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत. यातील काही भाग आता प्रभाग 18 मध्ये गेला आहे. त्यामुळे आता येथे विद्यमानांमध्येच चुरस रंगणार आहे. विरोधकांमध्येही इच्छुकांची संख्या अधिक असून, त्यांच्यात नवा जोश निर्माण झाला आहे. सत्ताधाऱ्यांनी न केलेल्या कामांची पोलखोल करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
प्रभागातील समाविष्ट भाग
एसएम. जोशी पूलाचा अलिकडचा भाग, पूना हॉस्पिटल, अलका टॉकिज, अनाथ हिंदू महिलाश्रम, सीताफळ बाग, कबीरबाग, वर्तक उद्यान, ओंकारेश्वर, शनिवारपेठ, हुजुरपागा शाळा, दगडूशेठ मंदिर, नाना वाडा, विश्रामबागवाडा, कुमठेकर रस्ता, चिमण्या गणपती मंदिर, स्काऊट मैदान, एसपीज बिर्याणी, एस. पी. महाविद्यालय, लोकमान्य नगर पोस्ट ऑफिस, दीक्षित बाग, लोकमान्यनगरचा काही भाग, केसरीवाडा, पत्र्यामारूती, पेरूगेट पोलीस चौकी, भावे हायस्कूल, हत्ती गणपती आदी भाग.
विद्यमान नगरसेवक
गेल्या पंचवार्षिकमध्ये केलेले विशेष काम
दूरदृष्टी आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी शहराच्या प्रगतीला खीळ बसली होती. पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या अनेक योजना वर्षानुवर्षे कागदावरच होत्या. शहरात 23 गावे समाविष्ट झाली, परंतु त्यांना पायाभूत सुविधा देण्याचे आव्हान होते. यामध्ये रस्ते, पदपथ, प्राथमिक आरोग्यकेंद्र, पाणीपुरवठा, पथदिवे, घनकचरा व्यवस्थापन आणि 140 कि.मी.च्या मलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू केले. स्थायी समिती अध्यक्षपदाच्या काळात विकासकामांना निधी उपलब्ध करण्याचे आव्हान पेलले. याशिवाय शहराबरोबरच प्रभागातील रस्ते, पाणी विविध प्रकल्पांचे कामही पूर्ण केले आहे.हेमंत रासने (भाजप)
करोना काळात बरेच काम केले आहे. रस्त्यांची कामे केली आहेत. ओंकारेश्वराजवळील ध्यानमूर्तीचे शिल्प, बाबू गेनूचे शिल्प केले आहे. शहरामध्ये रिकाम्या जागा कुठेच नाहीत. बागांमध्येही जागा नाही त्यामुळे जेवढे दुरुस्ती वगैरे काम करता येईल ते केले आहे. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी वॉल्व्ह बदलले आहे. करोनामुळे बजेट मिळाले नाही. ते मिळाले असते तर आणखी बरेच काही केले असते. परंतु करोना काळात हजारो किट वाटले, जेवण दिले. आर्सेनिक आल्बमच्या गोळ्या दिल्या, प्रभागांमध्ये जंतुनाशक फवारणी केली. भाजीपाला रास्त दरात उपलब्ध करून दिला. समाजातील सर्व घटक दिव्यांग, तृतीयपंथीय आहेत, त्यांना मदत दिली.ऍड. गायत्री खडके (भाजप)
1986 पासूनच्या एचसी-एमटीआर रस्त्याचे काम मार्गी लावले. ई-बसेस सुरू केल्या. नानावाड्याचे संपूर्ण सुशोभिकरण आणि नूतनीकरण तसेच क्रांतीकारक संग्रहालयाची निर्मिती, मुळा-मुठेवर सर्वात मोठ्या एसटीपी प्लॅंटची उभारणी, स्मार्ट सिटी अंतर्गत पुण्यातील रस्त्यांचे रिडिझायनिंग, स्टार्टअप हब, ई-बसेस, प्लेस मेकिंग, ट्रांझिट हब, ऑप्टिकल फायबर टाकणे, पीएमआरडी, 24/7 पाणीपुरवठा लाइन टाकणे, मनपाच्या 267 शाळा आणि 30 माध्यमिक शाळांमध्ये इ लर्निंग सेवा, विविध पुरस्कार दिले. मुक्ता टिळक (भाजप)
कंटेनरमुक्त प्रभाग करू असे सांगितले होते. मध्यवस्तीत असल्यामुळे मोठ्या प्रकल्प करण्याला संधी नाही. जेवढे बजेट मिळाले त्याचा वापर केला गेला. कॉंक्रीटच्या रोडवर खर्च केले. डांबरीकरण, कॉंक्रीटचे रस्ते करताना पावसाळी लाइन टाकल्या. जुन्या ड्रेनेजलाइन काढून मोठ्या व्यासाच्या ड्रेनेजलाइनचे काम केले. पेठांच्या भागात बहुतांश मोठ्या शाळा येतात. त्यामुळे वाहतुकीचे कोंडी होते. त्यांच्या व्हॅन, शाळा असतात. अनेक शाळांना विनंती केली आहे की त्यांनी शाळेच्या मैदानात पार्किंग करावे अशी विनंती शाळांना केली. काही शाळांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. वाहतुकीचे डायरेक्शन देणारे फलक लावले.राजेश येनपुरे (भाजप)
गतपंचवार्षिकचे लढवय्ये जनसेवक
प्रभागातील कामांबाबत त्यांचे मत…
गेल्या दहा वर्षांपासून ते नगरसेवक आहेत. सलग स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. प्रभागामध्ये खूप छोट्या समस्या प्रलंबित आहेत. हे स्वत:च्या फायद्यासाठी झीरो बजेट करून घेतात पण, पुढे काहीही काम होत नाही. स्वच्छतागृहांपासून अवस्था बिकट आहे. जनसंपर्क कार्यालय बंदच असते, लोकांना कसे भेटणार. पारंपरिक मतदारांना गृहित धरले आहे, त्यामुळे लोकांची कामे केली जात नाहीत. पारंपरिक मतदार हा मोदी, संघ यांच्याकडे पाहतो. गणेश भोकरे (मनसे)
सार्वजनिक पार्किंग सुविधा विकसन करायची होती. सतीश मिसाळ आणि बाबू गेनू या पार्किंगच्या दोन जागा विकसित करणे आवश्यक होते. पालिकेची एक जागा होती बीओटीवर प्रकल्प उभारला नाही, ती जागा स्टॉलधारकांना दिली. चौकात नथीचे प्रतिकृती लावली आणि त्याचे उद्घाटन केले, अशी कामे त्यांनी केली. लस दिल्यानंतर महापालिका गोळ्या देते. त्याच गोळ्यांवर स्वत:चे नाव टाकून दिले. एक रस्ता चार चार वेळा खोदण्याचे काम केले. करोना काळात 91 लाख रुपये खर्चून रस्त्यावर पांढरे पट्टे मारले. काम न करता बिले काढली आहेत. त्यामध्ये कॉंक्रीटीकरण, ड्रेनेज साफसफाई वगैरे कामांचा समावेश आहे. वाहतुकीचा प्रश्नही सोडवला नाही. एकच रस्ता चारजणांनी आळीपाळीने खोदला.ऍड. रुपाली पाटील – ठोंबरे
(राष्ट्रवादी कॉंग्रेस, पूर्वी मनसे)
रस्ते, पाणी, कचऱ्याचे प्रश्न सोडवले नाही, रस्ते पुन्हा पुन्हा खोदले, कॉंक्रीटचा रस्ता पुन्हा खोदण्याचे प्रताप केले होते. सिग्नलच्या मेंटेनन्सला 58 कोटी रुपये मंजूर करून घेतले, कॉफीटेबल बुकसाठी 39 लाख रुपये खर्ची घातले. एकही काम पूर्ण केले नाही. सगळी कामे अर्धवट केली आहे. प्रभागातील वाहतुकीचा प्रश्न अद्याप सोडवला नाही. जनतेला वेळही ते देत नाहीत.दीपक पोकळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
पार्किंगचा प्रश्न सोडवणार सांगितले होते, ते करू शकले नाहीत. येथे प्रमुख बाजारपेठा आहेत. त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. पाण्याच्या लाइन जुन्या आहेत, त्या बदलल्या नाहीत. वाहतूक नियंत्रण नाही, कारण त्याचे व्यवस्थापनच केले नाही. रस्ते राष्ट्रीय मानकाप्रमाणे केले नाहीत. जागा नाहीत ही पेठांमधील वस्तुस्थिती असली तरी ज्या जागा आहेत त्याही त्यांनी फुटपाथ वाढवून घालवल्या आहेत. त्यावर अनधिकृत पथारीवाले आले आहेत. फुटपाथचा वापर लोकांना चालण्यापेक्षा अनधिकृत पथारीवालेच वापरत आहेत. महापालिकेच्या तीन शाळा येतात. त्या शाळा रिकाम्या आहेत. विद्यार्थी आणण्याऐवजी त्याठिकाणी अन्य उपक्रम सुरू केले आहेत. चार-पाच वर्षांत त्या बंद पडतील. झाशीची राणी शाळेत तर क्षेत्रीय कार्यालयच करून टाकले आहे. गोगटे शाळेत अभ्यासिकाच आहे. आशीष देवधर मनसे
2022 निवडणुकीसाठी इच्छुक
भाजप : हेमंत रासने, धीरज घाटे, राजेश येनपुरे, ऍड. गायत्री खडके, बापू मानकर, प्रमोद कोंढरे, कुणाल टिळक, स्वरदा बापट, हेमंत लेले, शैलेश लडकत, केदार मानकर, अश्विनी पांडे, मोना गद्रे, मनिषा घाटे. राष्ट्रवादी कॉंग्रेस : दीपक पोकळे, संदीप उर्फ अप्पा जाधव, अजिंक्य पालकर, स्वप्नील थोरवे, राहुल पायगुडे, विद्या पोकळे, माधुरी काटे शिवसेना : निरंजन दाभेकर, प्रसाद काकडे, आनंद घरत, उमेश गालिंदे. कॉंग्रेस : अंजली सोलापुरे, मोनिका खलाने, ऋषिकेश वीरकर, गोपाळ तिवारी, बाळासाहेब दाभेकर, अश्विनी नाणेकर, राजाभाऊ नाणेकर, महेश सालेकर, कुणाल काळे, गोरख पळसकर, गौरव बोराडे मनसे : आशिष देवधर, किर्ती हांडे, जयश्री पाथरकर, गणेश भोकरे