पुणे – बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत गोंधळ झाल्याने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या जानेवारी महिन्यात पुन्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे ही परीक्षा घेतली जाणार आहे.
राज्य शासनाच्या बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी दोन दिवसांपूर्वी परीक्षा घेण्यात आली. पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून घेण्यात आलेल्या या परीक्षेत २०१९ झालेल्या सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका जशीच्या तशी विद्यार्थ्यांना देण्यात आली.
मात्र, त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सारथीचे वरिष्ठ अधिकारी आणि महाज्योती संस्थेचे प्रमुख ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. त्यात ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, फेलोशीप परीक्षेसाठी सेट विभागाकडून अनावधानाने २०१९ ची सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.आता येत्या जानेवारी महिन्यात पुन्हा परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. त्याबाबतची अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.