पुणे – गर्दीने फुललेली दुकाने….वह्यांची थप्पी…पेन्सिल, पेन आदी साहित्याचा वेगळा ट्रेन्ड… पुस्तके खरेदी लगबग… शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व खरेदी करण्याची लहानग्यांची घाई.., असे वातावरण दरवर्षी बाजारपेठांत पाहायला मिळते. पण, करोनामुळे मागील वर्षी अप्पा बळवंत चौकातील दुकाने शांत होती. यंदा मात्र निर्बंध शिथिल केल्यानंतर विविध पुस्तकं तसेच शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी या चौकातील दुकानांत गर्दी दिसू लागली आहे.
शाळा सुरू होण्यापूर्वी दरवर्षी पुस्तके, वह्यांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. मात्र, मागील वर्षी करोनामुळे शालेय पुस्तक आणि साहित्य विक्रीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला होता. अनलॉकच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शैक्षणिक साहित्य आणि पुस्तकांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढू लागली आहे.
मागील वर्षभरापासून पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. तर पुढील आठवड्यात नवे शैक्षणिक वर्ष देखील सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची वह्या, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. याशिवाय दुकानांच्या बरोबरीने पुस्तकांच्या लहान स्टॉलवर देखील ग्राहकांची गर्दी होत आहे. परंतु, प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्याने पुस्तकांची कव्हर, नावांचे स्टीकर्स, कंपास आदी साहित्याची मागणी काही अंशी घटल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
अनेकांकडून आगाऊ बुकिंगचा पर्याय…
पुस्तके सहज खरेदी करता यावीत आणि दुकानातील गर्दी देखील टाळण्यासाठी विक्रेते आणि शाळांनी समन्वय साधत आगाऊ बुकिंगचा पर्याय पालकांना उपलब्ध होणार आहे. यासाठी शाळांकडून पालकांना याबाबत माहिती देण्यात येत आहे. त्यानुसार पालकांनी संपर्क साधल्यानंतर, विक्रेते साहित्याचे सेट तयार ठेवत आहेत. यामुळे पालकांचा वेळ आणि निवड करणेदेखील वाचत आहे.
यंदा ऑनलाइन अभ्यास सुरू असला, तरी पारंपरिक पद्धतीने म्हणजेच पुस्तक समोर ठेवून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 90 टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे पुस्तकांची मागणी चांगली आहे. परीक्षांबाबत निश्चितता असली तरीदेखील पुढील वर्षीची पुस्तके खरेदी करण्याचे प्रमाण जास्त आहे. पाल्याच्या अभ्यासासाठी पालकांकडून सर्व गोष्टींची खरेदी करण्यात येत आहे. मात्र, मागील कालावधीत आर्थिक गणिते कोलमडल्याने “ब्रॅन्डेड’ वह्या, स्टेशनरी घेण्याचा कल कमी झाला आहे.
– सुकुमार बेरी, शैक्षणिक साहित्य विक्रेते