पुणे – पुणे शहरात करोना रुग्णांची टक्केवारी ही 5 टक्के, तर ऑक्सिजनवरील रुग्णांचे प्रमाण 23.1 टक्के आहे. त्यामुळे शहरातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. या प्रमाणनुसार पुणे शहराचा समावेश अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात होत आहे.
त्यामुळे शहरातील दुकाने आता सायंकाळी सात वाजेपर्यंत उघडी राहणार आहे. हा निर्णय सोमवारपासून (दि.14) लागू केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागात करोना बाधितांचा दर अधिक असल्याने या ठिकाणी पूर्वीचेच निर्बंध कायम राहतील, असे पवार यांनी सांगितले.
विधानभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री पवार यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारने करोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात पाच स्तर निश्चित केले आहेत. या पाचही स्तरांसाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत.
पुणे शहराचा समावेश तिसऱ्या टप्प्यात होत होता. आता शहरातील करोनाबाधित रुग्णांची घटती संख्या विचारात घेता शहरातील निर्बध शिथिल करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार पुणे शहराचा समावेश आता दुसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्याचे नियम सोमवारपासून लागू करण्यात येणार आहे. या निर्णयानुसार हॉटेल रात्री 10 पर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच अभ्यासिका, ग्रंथालय ही 50 टक्के उपस्थितीत सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर मॉल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे आदेश हे पालिका आयुक्तांनी काढले आहेत.
सोमवारपासून हे नियम
दुकानांच्या वेळा सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत
बसमध्ये 100 टक्के आसन क्षमतेने प्रवास, मात्र उभे राहून प्रवास करण्यास मनाई
मॉल, अभ्यासिका, ग्रंथालये 50 टेक् क्षमतेने सुरू
हॉटेल रात्री 10 वाजेपर्यंत क्षमतेच्या 50 टक्केच सुरृ
हॉटेलमधील पार्सल सेवा रात्री 11 पर्यंत
सार्वजनिक मैदाने पहाटे 5 ते सकाळी 9 व
दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुले
लग्न समारंभास जास्तीत जास्त 50 लोकांनाच परवानगी
अंत्यसंस्कारासाठी 20 व्यक्तींनाच परवानगी
सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रम 50 लोकांच्या उपस्थितीत
जिम, सलून, स्पा 50 टक्के क्षमतेने सुरू
शहरात 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी,
तर रात्री 10 नंतर संचारबंदी
मद्यविक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहणार