पुणे (प्रतिनिधी) : शहरातील महिला सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांनी पूर्वी सुरू केलेल्या बडीकॉप, पोलिस काका, पोलिस दिदी, दामिनी योजना पुन्हा सुरू करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत.
त्यानुसार आणखी व्यापक स्वरूपात योजना राबवून महिलाच्या सुरक्षेसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचबरोबर गर्दीच्या ठिकाणी व्हिजीबल पोलिसिंगसाठी 17 पोलीस पथकांची स्थापना करण्यात आली आहे. आयुक्तालयात सोमवारी गुन्हे आढावा बैठक पार पडली. त्यावेळी पोलिस आयुक्तांनी महिला सुरेक्षाबाबत दक्ष राहण्याच्या सूचना सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना दिल्या आहेत.
महिला सुरेक्षाबाबत राबविलेल्या योजना पुन्हा सुरू केल्या जाणार आहेत. पुणे पोलिस दलाकडून सध्या दामिनी पथक सुरू आहे. पण, आता दोन टप्प्यात दामिनी पथक काम करणार आहे. पोलिस गणवेशात गस्त घालण्यासाठी 17 पथके तयार करण्यात आली आहेत.
दोन पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक पथक दुचाकीवरून गस्त घालणार आहे. तर, दुसरे पथक गुन्हे शाखेच्या अधिपत्याखाली काम करणार असून संबंधित पथकाकडून साध्या वेशात शाळा, महाविद्यालयात जावून मार्गदर्शन केले जाणार आहे. दोन्ही पथकाची व्यापकता वाढवून त्यांना कामासाठी प्रशिक्षत केले जाणार आहे.