पुणे- समाजात अवयवदानसाठी प्रोत्साहन आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती गरजेची आहे, असा सूर जागतिक अवयवदान दिनानिमित्त घेतलेल्या चर्चासत्रात तज्ज्ञांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे “महाअवयवदान अभियान-2021′ अंतर्गत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या मार्गदर्शनात ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या ऑनलाइन चर्चासत्रात कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, प्रादेशिक तथा राज्य अवयव प्रत्यारोपण संस्थेच्या संचालक डॉ. सुजाता पटवर्धन, राज्य अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्थेच्या सल्लागार समितीच्या सदस्या डॉ. कामाक्षी भाटे, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक आदी सहभागी झाले होते.
आरोग्य विद्यापीठातर्फे दरवर्षी अवयवदान जनजागृती संदर्भात विविध कार्यक्रम राबवण्यात येतात. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी अवयवदानविषयी मुख्यतः ग्रामीण भागात प्रचार आणि प्रसार करावा. अवयवदानाचे महत्त्व विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा, वकृत्व, चित्रकला पोस्टर स्पर्धा, ऑनलाइन व्याख्याने यांच्या माध्यमातून समाजात प्रबोधन करण्याबाबत सर्व संलग्नित महाविद्यालयांना निर्देशित करण्यात आले आहे,’ असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
डॉ. पटवर्धन म्हणाल्या, “अवयवदानाबाबत समाजात गैरसमज आहेत. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात रुग्ण अवयव मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अवयवदान अंतर्गत “लाइव्ह ऑर्गन डोनेशन’द्वारे किडनी आणि लिव्हर प्रत्यारोपण करण्यात येते. अवयवदान करण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी सरकारने निर्देशित केलेल्या संकेतस्थळावर नोंदणी करावी.’
“अवयवदान चळवळ आणि त्यातील आव्हाने’ या विषयावर डॉ. भाटे यांनी सांगितले,
“रुग्णाच्या मेंदूने काम करणे थांबवल्यानंतर त्याचे अवयवदान करण्यास काहीच हरकत नसते. मात्र अनेकदा संबंधित रुग्णांचे नातेवाईक शरीर पूर्णपणे मृत होईपर्यंत अवयवदान करू देत नाहीत. अवयवदानाबाबत पुरेशी जागरूकता नसल्यानेच असे प्रकार घडत असतात. अवयवदानात भारताचा दुसरा क्रमांक असला, तरी अवयवाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या व्यक्तींची यादी मोठी आहे.’