रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – राजगुरूनगर शहरात इलेक्ट्रिक दुचाकी सुरू करताना अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. या आगीत संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे. राजगुरूनगर शहरात वैशंमपायनआळी मधील एका बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली.
सौरभ सखाराम पाटील हे त्यांची दुचाकी MH 14 JS6620 ही इलेक्ट्रिक दुचाकी ओकिनावा ऑटो टेक कंपनीची प्राईस प्रो ची (OKINAWA AUTOTECT PRAISE PRO) ची इलेक्ट्रिक बोव( ELECTRIC BOV) आज दि.७ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सुरू करत होते. त्यावेळी इलेक्ट्रिक दुचाकीने अचानक पेट घेतला. गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालक बाजूला झाल्याने मोठे संकट टळले.
परंतु या आगीत गाडी जळून खाक झाली. दरम्यान, सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक गाड्यांचा जमाना आला आहे. सुरक्षित आणि पेट्रोल महागाईवर मात करण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आल्या आहेत. मात्र अशा गाड्या अचानक पेट घेत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.