प्रवासात मिळणार 30 टक्के सवलत
पुणे – शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महामेट्रोकडून आजपासून “एक पुणे विद्यार्थी पास कार्ड’ सुरू केले जाणार आहे. मेट्रोतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रिपेड कार्ड असून भारतीय पेमेंट (रूपे) योजनेवर आधारित आहे.
विशेष म्हणजे भारतातील इतर कोणत्याही मेट्रो आणि बस सेवांमध्ये वापरले जाऊ शकते. हे एक स्पर्श विरहित (कॉन्टॅक्टलेस) कार्ड आहे आणि त्यामुळे पेमेंट जलद होते. “एक पुणे विद्यार्थी पास” सर्व मेट्रो स्थानकांवर उपलब्ध आहे. मात्र, महामेट्रोकडून केवळ 13 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठीच हे कार्ड देण्याचा निर्णय घेतला असल्याने सातवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे.
असे असेल कार्ड
“एक पुणे विद्यार्थी पास” कार्ड घेण्यासाठी 13 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, त्याखालील वय असणारे विद्यार्थी हे कार्ड घेऊ शकत नाहीत. 13 ते 18 वर्षे वय असणारे विद्यार्थी पॅन कार्ड नसल्यास एक ई-फॉर्म भरून आपले “एक पुणे विद्यार्थी पास” कार्ड प्राप्त करू शकतात.
यासाठी आधार कार्डच्या शेवटच्या चार क्रमांकाची आवश्यकता असेल. हे “एक पुणे विद्यर्थी पास” कार्ड घेण्यासाठी महाविद्यालयाचे अधिकृत ओळखपत्र किंवा चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक असेल. हे कार्ड घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला तिकीट दरामध्ये 30% सवलत लागू करण्यात आली आहे. या कार्डची वैधता 3 वर्षे असून हे कार्ड अहस्तांतरणीय आहे.
असे मिळविता येईल कार्ड
हे कार्ड प्राप्त करण्याची प्रकिया “एक पुणे कार्ड”प्रमाणे आहे. हे कार्ड सर्व मेट्रो स्थानकांवर उपलब्ध आहे. प्रवासी पुणे मेट्रोच्या संकेत स्थळावर उपलब्ध ई-फॉर्म भरून “एक पुणे विद्यर्थी पास” प्राप्त करू शकतात. या कार्डमध्ये पैसे भरण्यासाठी आपण कोणत्याही ई-वॉलेट, पुणे मेट्रो स्थानकात येऊन किंवा एक पुणे कार्ड संकेतस्थळावरून ऑनलाइन (2000 रु.पर्यंत) अशा पद्धतीचा वापर करू शकतो. या कार्डद्वारे कोणतेही रुपयांपर्यंतचे व्यवहार सहज करता येऊ शकतात. या कार्डला दिवसाच्या 20 व्यवहारांची मर्यादा देण्यात आली आहे. पहिल्या दहा हजार विद्यार्थ्यांना हे कार्ड मोफत देण्यात येणार असून नंतरच्या विद्यार्थ्यांना 150 रुपये कार्डचे शुल्क तसेच 75 रूपये वार्षिक शुल्क भरावे लागणार आहे.