पुणे – मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच मेट्रो प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी आता मेट्रो स्थानकाच्या परिघात ई- बसची सुविधा दिली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेस १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत आलेल्या निधीतून छोट्या आकाराच्या ई- बसची खरेदी केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव ३ जानेवारीस होणार्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे.
या बसेससाठी नाममात्र तिकीट आकारले जाणार आहे. परिणामी, प्रवाशांना सुविधा मिळण्यासह,स्थानिक नागरिकांना बसची सुविधा उपलब्ध होऊन मेट्रो स्थानकांवरच्या पार्किंगची समस्या सुटण्यासही मदत होणार आहे. सध्या मेट्रोच्या फीडर सेवेसाठी पीएमपी तसेच खासगी रिक्षांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्याचा फारसा उपयोग होत नसून केवळ स्थानक परिसरातील नागरिकच मेट्रोचा वापर करत आहेत. दोन किलोमीटरच्या परिसरातील नागरिक खासगी वाहन घेऊन मेट्रोसाठी येतात.
मात्र, तेथे पार्किंग सुविधा नसल्याने वाहने जागा मिळेल तिथे लावली जातात. त्यामुळे नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंंत सहज येता यावे, यासाठी ई- बसची सुविधा दिली जाणार आहे. या बस पीएमपीच्या मालकीच्या असल्यास महापालिकेस केवळ बसचे चार्जिंग, देखभाल दुरूस्ती तसेच चालक- वाहकाचे वेतन द्यावे लागेल. त्यामुळे या बस रिकाम्या धावल्या, तरी नुकसान होणार नाही. या उलट ठेकेदरांच्या बस दिल्यास त्या रिकाम्या धावल्या, तरी त्याचे प्रती किलोमीटर पैसे मोजावे लागतील. यामुळे स्वमालकीच्या बस घेऊन त्या फीडर सेवेसाठी वापरण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
प्रस्ताव संचालक मंडळासमोर
शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेस १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत मोठया प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे. यातून महापालिका प्रशासनाकडून पीएमपीसाठी या बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. त्यात, पीएमपी तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेचाही निधी असणार आहे. या बाबतचा प्रस्ताव संचालक मंडळासमोर ठेवला जाणार आहे.