पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे पोलिसांनी विविध मार्गांवरील वाहतुकीत बदल केला आहे. यामुळे वाहतूक कोंडी लक्षात घेता, कार्यक्रम स्थळ परिसरातील आणि शहराच्या मध्यवर्ती भागांतील बहुसंख्य शाळा, महाविद्यालयांनी मंगळवारी सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान काही शाळांच्या चाचणी परीक्षाही लांबणीवर टाकण्यात आलेल्या आहेत.
पंतप्रधान सकाळी 11 वाजता दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. त्यानंतर सकाळी 11.45 वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान दुपारी 12.45 वाजता शिवाजीनगर येथील पोलीस मैदानावर होणाऱ्या विविध विकास प्रकल्पाच्या उद्घाटन व पायाभरणीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
शिवाय, मंगळवारी सकाळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती आहे. त्यामुळे वाहतूक नियोजनात बदल करण्यात आला आहे.
त्यातच रिक्षा व स्कूलबस चालकांनीही वाहतूक कोंडीबाबत अडचणी सांगितल्या होत्या. त्यामुळे शहरातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्याची मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली होती.
या शाळा महाविद्यालयांना सुट्टी
स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर कार्यक्रम होणार असल्याने या महाविद्यालयासह परिसरातील शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर्व शाळांना सोमवार व मंगळवार अशी दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. टिळक रस्त्यावरील काही शाळा, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदीर परिसरातील शाळा, शिवाजीनगर येथील पोलीस मैदानाजवळील शाळा व महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.
यात शिक्षण प्रसारक मंडळी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, विद्या प्रसारिणी सभा यासह अन्य काही संस्थांच्या शाळांनी स्वत:च्या अधिकारात सुट्टी घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मध्यवर्ती भागासह बाणेर व इतर काही उपनगरांतील काही शाळांनीही सुट्टी जाहीर केली आहे. शाळांनी विद्यार्थी, पालकांना सुट्टीबाबत “एसएमएस’ही पाठविले आहेत. काही शाळांनी मंगळवारी ऑनलाइन वर्ग घेण्याचा निर्णय घेतला आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. पण, महापालिका प्रशासनाने अधिकृतपणे शाळांना सुट्टी देण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, स्थानिक पातळीवर शाळांना वेळेत बदल करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.”
– संजयकुमार राठोड, प्रभारी प्रशासकीय अधिकारी, मनपा