पुणे, दि. 23 -डमी आडत्यांकडून शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर डमी आडत्यांसह बाजारात काम करणाऱ्या इतर घटकांची माहिती बाजार समितीकडे नसल्याचे निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर बाजार समितीने सकारात्मक पाऊल उचलले आहे. डमी आडत्यांसह गाळ्यावर काम करणारे दिवाणजी, हमाल, मदतनीस यांची माहिती बाजार समितीला देणे बंधनाकारक करण्यात आले आहे. संबधिताचे आधार कार्ड, पॅन कार्ड, दोन फोटो आणि रहिवासी दाखला फळ आणि भाजीपाला विभागातील गाळेधारकांना बाजार समितीकडे द्यावे लागणार आहे. बाजार समितीने प्रशासक मधुकांत गरड यांच्या सहिने हे परिपत्रक काढण्यात आले आहे.
डमी आडते साधा कागद अथवा व्हॉट्सऍपवर शेतकऱ्यांना बिल देत असल्याचे उघडकीस आले. यामुळे बाजार समितीचा सेस तर बुडतोच; परंतु पैसे देण्यास टाळाटाळ केल्याचा आणि धमकाविल्याचा तक्रारी शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे केल्या आहेत. अशा घटनांमध्ये काही डमी हे परप्रांतीय आहेत. त्यांची पुरेशी माहिती असणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन बाजार समितीने सुरक्षितेच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलले आहे. लवकरात लवकर माहिती जमा करण्यास गाळेधारांना सांगितले आहे.
गाळेधारकांचीच जबाबदारी
बाजारातील डमी आडत्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविल्याच्या तक्रारी बाजार समितीकडे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे पैसे बुडविल्यास अथवा सेस चुकविल्याचे निष्पन्न झाल्यास, ते भरण्याची जबाबदारी गाळेधारकांचीच आहे. गाळेधारकानेच डमी आडत्याला भाडे घेऊन व्यापार करण्यास परवानगी दिलेली असते. त्यामुळे गाळेधारकांनाच फसवणुकीचे पैसे भरावे लागतील, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मधुकांत गरड यांनी सांगितले.