पुणे, दि. 23 -शहरात गेल्या तीन आठवड्यांपासून डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली असून, 20 दिवसांत सुमारे 74 रुग्ण आढळले आहेत. हडपसर आणि मुंढवा या प्रभागात सर्वाधिक रुग्णसंख्या असून, त्यानंतर औंध आणि बाणेर या प्रभागांचा क्रमांक लागतो. या वर्षांत डेंग्यूची लागण झालेले एकूण 352 रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूला आळा घालण्यासाठी घर व परिसरात स्वच्छतेवर नागरिकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 20 दिवसांत आढळलेल्या 74 रुग्णांतील सर्वाधिक रुग्ण हडपसर-मुंढवा, औंध-बाणेर या भागातील आहेत. एकूण आढळलेल्या 352 रुग्णांतील 46 रुग्ण हडपसर-मुंढवा येथील, 43 रुग्ण औंध-बाणेर येथील आहेत. याशिवाय नगर रस्ता-वडगाव शेरी येथे 42, टिळक रस्ता-सिंहगड रस्ता येथे 33, कोथरूड येथे 22 आणि वारजे-कर्वेनगर येथे 24 रुग्णांची नोंद झाली आहे.
रुग्णांची संख्या वाढत चालल्याने रुग्णालयात दाखल रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. सर्व वयोगटांतील रुग्ण डेंग्यूचे शिकार झाले असून, लहान मुलांमध्येही डेंग्यूची लक्षणे आढळली आहेत. ताप, खोकला, सर्दी, डोके दुखणे आदी लक्षणांचा यात समावेश आहे. लक्षणांच्या तीव्रतेनुसार चार-पाच दिवस ती लक्षणे राहतात. मात्र त्यापेक्षा जास्त कालावधीपर्यंत ही लक्षणे राहिली तर गंभीर परिस्थिती निर्माण होते आणि अतिदक्षता विभागात दाखल करण्याची वेळ येऊ शकते.
आवारात कचरा टाकताना दिसल्यास आम्ही गृहनिर्माण सोसायट्यांना नोटीसा बजावत आहोत. त्या भागात डासांची उत्पत्ती होण्याची ठिकाणे आढळून आल्यावर आम्ही वैयक्तिक नोटिसाही बजावत आहोत. तसेच दंडात्मक कारवाईही केली जात आहे.
-प्रसाद काटकर, क्षेत्रीय अधिकारी, हडपसर-मुंढवा