पुणे : विश्रांतवाडी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून या चौकात 2 ग्रेड सेपरेटर तसेच एक उड्डाणपूल होणार आहे. मात्र, या कामात कुठेही मेट्रोचा विचार केलेला नाही. त्यामुळे हा पूल उभारताना नळस्टॉप तसेच पुणे विद्यापीठातील मेट्रोसाठीच्या दुहेरी उड्डाणपूलाच्या धर्तीवर पूल उभारण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या पूलाच्या खर्चास महापालिकेच्या एस्टीमेट कमिटीने मान्यता दिलेली आहे. याची निविदा अद्यापही काढण्यात आलेली नाही. त्यामुळे, प्रशासनाने तत्काळ आराखड्यात बदल करावा अशी मागणी टिंगरे यांनी केली आहे. दरम्यान, या रस्त्याच्या बाजूने महापालिकेचा एचसीएमटीआर रस्ता जातो. या रस्त्यावर पालिकेकडून निओ मेट्रो प्रस्तावित आहे. मात्र, या भागात लष्करी अस्थापना असल्याने निओ मेट्रोला अडचणी येणार आहेत. त्यामुळे, या भागात महामेट्रोचाच प्रकल्प व्हावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
टिंगरे म्हणाले की, विश्रांतवाडी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून या चौकात आळंदी ते विमानतळ मार्गावर उड्डाणपूल आहे तर आळंदीकडून पुण्याकडे तसेच विमानतळाकडे जाण्यासाठी वाय आकाराचा ग्रेड सेपरेटर आहे. मात्र, या प्रकल्पात भविष्यात या भागात कुठेही मेट्रो प्रकल्पाचा विचार करण्यात आलेला नाही. या भागात गेल्या काही वर्षात मोठया प्रमाणात नागरिकरण झाले असल्याने रस्ते लहान आहे. या भागात केवळ पीएमपीची वाहतूक सुविधा आहे. त्यामुळे, भविष्यात या भागातही सार्वजनिक वाहतूकीचा जलद पर्याय म्हणून मेट्रो सेवा आवश्यक आहे.
मात्र, त्याचा काहीच विचार प्रशासनाने केलेला नाही. त्यामुळे, विमानतळापर्यंत येणारी मेट्रो सेवा या भागातही विस्तारणे आवश्यक असल्याने भविष्यात हा पूल पाडावा लागेल ही बाब लक्षता घेऊन हा पूल दुहेरी करावा, तसेच या भागात निओ मेट्रो प्रस्तावित असली तरी एचसीएमटीआर रस्त्यावर आहे. त्यात,लष्कराच्या जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे. ही बाब अशक्य आहे. त्यामुळे, या भागातही महामेट्रोलाच प्राधान्य द्यावे अशी मागणी टिंगरे यांनी केली आहे.